महाविकास आघाडीच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्राची पीछेहाट : देवेंद्र फडणवीस | पुढारी

महाविकास आघाडीच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्राची पीछेहाट : देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर : 2014 ते 2019 या कालावधीत औद्योगिक प्रगतीमध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर होता; मात्र महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्राची पिछेहाट होत आहे, अशी खरमरीत टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी रविवारी उद्योजक, व्यापारी, वकील वर्ग, डॉक्टर्स यांच्यासह प्रतिष्ठित व्यक्तींच्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. भाजप प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून महासैनिक दरबार हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

फडणवीस म्हणाले, करवीरनगरीची ओळख उद्यमनगरी अशी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दोन वर्षांच्या लॉकडाऊन काळात आत्मनिर्भर पॅकेजच्या माध्यमातून देशातील उद्योगधंद्यांना बूस्टर डोस दिला. दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारची चुकीची धोरणे, विजेची टंचाई अशा कारणांमुळे राज्यातील उद्योजक बिकट अवस्थेत आल्याची टीका फडणवीस यांनी केली.

मंत्र्यांकडूनच खंडणीसाठी उद्योजक वेठीस

ते म्हणाले, सरकारमधील काही मंत्र्यांकडूनच खंडणीसाठी उद्योजकांना वेठीस धरले जात आहे. गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर घसरले, तरीही या सरकारला काही सोयरसूतक नाही. कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच व्हावे, यासाठी भाजप सरकारने मंत्री मंडळाचा ठराव करून, तो उच्च न्यायालयाकडे पाठवला होता. 1100 कोटी रुपये निधीची तरतूदही भाजप सरकारने केली होती.

या प्रश्नावर उच्च न्यायालयाने निर्णय घ्यायचा आहे, त्यासाठी पाठपुरावा करू, असे फडणवीस यांनी सांगितले. भाजप सरकारने कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसंबंधी सकारात्मक भूमिका घेऊन प्राधिकरणाचीही स्थापना केली; मात्र महााविकास आघाडीमुळेच हद्दवाढ रखडल्याचे फडणवीस म्हणाले. आ. चंद्रकांत पाटील, सत्यजित कदम, आ. प्रकाश आवाडे, रणजितसिंह मोहिते पाटील, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. जयकुमार गोरे, चित्रा वाघ, शौमिका महाडिक, समरजितसिंह घाटगे यांच्यासह उद्योजक प्रदीपभाई कापडिया, अभिजित मगदूम, मोहन मुल्हेरकर, जयेश ओसवाल, जयेश कदम, अरुंधती महाडिक, पृथ्वीराज महाडिक आदी उपस्थित होते.

Back to top button