सातारा

सातारा : जवान सुधीर निकम अनंतात विलीन

मोहन कारंडे

वेणेगाव : पुढारी वृत्तसेवा

18 मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटमधील जवान सुधीर सूर्यकांत निकम (वय 38, रा. अपशिंगे मि. ता. सातारा) यांचे कर्तव्य बजावत असताना मंगळवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. ते गुजरात जामनगर येथे लान्स नाईक या पदावर कार्यरत होते. बुधवारी सकाळी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अंत्यदर्शनासाठी हजारोंच्या संख्येने मोठा जनसागर लोटला होता.

जवान सुधीर निकम यांची दुःखद घटना अपशिंगे मि. येथे समजताच संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला. त्यांच्या पार्थिवाकडे अपशिंगे मि.सह परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले होते. सकाळी बोरगाव मार्गे पार्थिव अपशिंगे मि. गावी घरी पोहचले. यावेळी अपशिंगे मि. गावात प्रत्येक घरासमोर रांगोळी काढून फुलांचा सडा टाकून त्यांना अभिवादन केले.

वीर जवान सुधीर निकम अमर रहे, भारत माता की जय, जब तक सुरज चांद रहेगा सुधीर तेरा नाम रहेगा, या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी अंत्ययात्रा मुख्य चौक, विजय स्तंभ, ग्रामपंचायत कार्यालय, असेंब्ली हॉल या मार्गावरून काढण्यात आली. अंत्यविधीची तयारी अपशिंगे मि. ग्रामस्थांनी केली होती. त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून अभिवादन केल्यानंतर पोलिस दल आणि लष्कराच्या तुकडीने शोकधून वाजवली. तसेच पोलिस आणि लष्कराच्या जवानांनी बंदुकीच्या प्रत्येकी तीन फैरी झाडून मानवंदना दिली.

दरम्यान, वीर जवान सुधीर यांचा मुलगा श्रवण व भाऊ सागर यांनी पार्थिवास भडाग्नी देतानाचा कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. वीर जवान सुधीर निकम यांनी 19 वर्ष सैन्यात आपली सेवा बजावत लान्स नाईक या पदावर कार्यरत होते.

शिक्षण घेत असतानाच देशसेवेसाठी सारे जीवन व्यतीत करण्याचा निर्णय सुधीर यांनी घेतला. बालपणीचे शिक्षण अपशिंगे मि. व बेळगाव येथे झाल्यानंतर जिद्द, चिकाटी व अथक परिश्रम या त्रिसूत्रीच्या जोरावर त्यांनी यश मिळवत अवघ्या 20 व्या वर्षी सैनिकात भरती झाले. गुजरात (जामनगर) येथे कर्तव्य बजावत असताना शारीरिक त्रास झाल्याने त्यांना मुंबई येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मंगळवारी पहाटे प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, भाऊ, चुलता, चुलती, आजी असा मोठा परिवार आहे.

यावेळी खा. उदयनराजे भोसले, सागर पाटील, तहसीलदार आशा होळकर, गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, जिल्हा परिषदेच्या अर्थ व शिक्षण समितीचे माजी सदस्य सुनील काटकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, सातारा पंचायत समितीचे सदस्य संजय घोरपडे, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विलासराव घाडगे, कल्याण संघटक चंद्रकांत पवार, बोरगाव पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक वर्षा डांळीबकर, किरण गायकवाड, राजेंद्र पवार, मंदार शेटे, 19 बटालियन एनसीसी कराडचे नायब सुभेदार संतोष कदम, हवालदार राहुल शेवाळे, दादासो सावंत, सरपंच सारिका गायकवाड, संजय निकम, हेमंत निकम, ग्रामविकास अधिकारी शामराव निकम आदी. मान्यवरांनी अभिवादन केले.

हेही वाचलंत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT