मणेराजुरी तलावात बुडून सांगलीच्या तरुणाचा मृत्यू | पुढारी

मणेराजुरी तलावात बुडून सांगलीच्या तरुणाचा मृत्यू

तासगाव : पुढारी वृत्तसेवा : मणेराजूरी येथील मुख्य साठवण तलावामध्ये मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान सांगलीच्या तरुणाचा बुडून मृत्यू जाला. . राहुल भरत बुरुड (वय ३०) असे त्याचे नाव आहे. मंगळवार रात्रीपासून तलावात मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते. अखेर बुधवारी सकाळी आठच्या सुमारास मृतदेह शोधण्यात रेस्क्यू टीमला यश आले.

तासगाव पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, सांगली पंचशीलनगर, शिंदे मळा परिसरातील ९ तरुण दोन चारचाकी गाड्यांनी देवदर्शनासाठी मंगळवारी (दि१०) सकाळी आरेवाडी येथे गेले होते. देवदर्शनहून परताना त्यांनी मणेराजूरीतील कोडयाचे माळ येथे असणारा तलाव पाहण्यासाठी थांबले होते. याच दरम्यान यातील राहुल बुरुड हा अंघोळीसाठी तलावात उतरला. खोल असणाऱ्या डोहातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना यश आले नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील दीपक तेली यांनी घटनास्थळी धाव घेवून तासगाव पोलीसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी सांगलीहून रेस्क्यू टीमला पाचारण केले .टीमने मंगळवारी सायंकाळपासून तलावात तरूणाचा मृतदेह शोधण्यास सुरुवात केली. दरम्यान, बुधवारी सकाळी पुन्हा शोध घेतला असता बुडालेल्या ठिकाणापासून वीस फूटावर राहुलचा मृतदेह आढळून आला.

तासगाव ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. राहुल हा ट्रान्सपोर्टच्या गाडीवर चालक म्हणून काम करत होता. तो विवाहित असून दोन मुले, पत्नी, भाऊ, आई असा परिवार आहे. या घटनेची तासगाव पोलीसात नोंद झाली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button