विटा : पुढारी वृत्तसेवा : पावसाळा आला की जशा बाजारात छत्र्या येतात. तशा निवडणुका पाहून या मतदारसंघात अनेक नेते छत्र्यासारखे उगवले आहेत. लवादाकडून टेंभू'ला पाणी वाढवून मिळाले. मात्र, काहीजण टेंभूच्या सहाव्या टप्प्याची पोस्टरबाजी करत आहेत. सहाव्या टप्प्यातून कोणकोणत्या गावात कसे पाणी जाणार याचे नियोजन माझ्या डोक्यात आहे. विरोधकांच्यामध्ये हिम्मत असेल, तर त्यांनी एका व्यासपीठावर समोरासमोर यावं, असे जाहीर आव्हान आमदार अनिलराव बाबर (Anil Babar) यांनी दिले.
खानापूर तालुक्यातील बानूरगड येथे ४ कोटी १३ लाख रुपयांच्या विविध विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी आमदार बाबर (Anil Babar) बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुहास शिंदे, खरेदी- विक्री संघाचे सदाशिव हसबे, गणपतराव भोसले, खानापूरचे नगराध्यक्ष डॉ. उदयसिंह हजारे, सरपंच सज्जन बाबर, पै. राजेंद्र शिंदे, ज्येष्ठ नेते लालासाहेब पाटील, संभाजी जाधव, सिद्धेश्वर गायकवाड, रामकृष्ण सुतार, दिनकर गायकवाड, हर्षवर्धन माने आदी प्रमुख उपस्थित होते.
आमदार बाबर म्हणाले, टेंभूचे जनक म्हणा म्हणून आपण स्वतः कधीच कुणाला सांगितले नव्हते. ही पदवी माझे टेंभू योजनेत केलेले कष्ट बघून जनतेने बहाल केली आहे. पण जनतेने दिलेले नावही विरोधकांना बघवत नाही. मग आपण केलेले काम कसे बघवेल. टेंभू योजनेचे आजवरचे योगदान बघता विरोधकांना घेऊन समोरासमोर एका व्यासपीठावर येण्याची आपली तयारी आहे. आजपर्यंत ज्या गावात पाणी येणार नाही, असे विरोधकांनी ज्या गावात जाऊन सांगितले. त्या त्या गावात पाणी पोहचवले आहे. तरीही विरोधक टीका करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.
ज्यांना स्वतःची ग्रामपंचायत सांभाळता येत नाही. तेही दुसऱ्यांवर टीका करत आहेत. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनाही एवढ्या वर्षांचे आपले काम माहीत आहे. बानूरगड परिसरातील गावांना येत्या काही महिन्यांत सहाव्या टप्प्याचे काम सुरू करून पाणी देणार, हा आपला शब्द आहे. गावाचा विकास कसा करावा, हे बाणूरगडचे सरपंच सज्जन बाबर यांच्याकडून शिकावे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांचे दुर्लक्षित समाधी स्थळ सुधारून पर्यटनासाठी खुले केले आहे, याचा मला अभिमान आहे, असेही आमदार बाबर म्हणाले.
यावेळी पोपट माने, संभाजी जाधव, सज्जन बाबर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी यशवंत हसबे, रामराजे माने, काकासो पाटील, महादेव चव्हाण, अमित शिंदे, राहुल बाबर, प्रदीप गायकवाड, रोहित गायकवाड यांच्यासह पळशी, बानूरगड, ताडाचीवाडी, कुसबावडे, हिवरे, करंजे, बेणापूर, सुलतानगादे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
हेही वाचलंत का ?