Praveen Darekar : शिवसेनेच्या आमदारांमधील नाराजीचा स्फोट पाहायला मिळेल : प्रवीण दरेकर | पुढारी

Praveen Darekar : शिवसेनेच्या आमदारांमधील नाराजीचा स्फोट पाहायला मिळेल : प्रवीण दरेकर

सांगली : पुढारी वृत्तसेवा : शिवसेना आमदारांमध्ये मोठी नाराजी आहे. त्यांच्यातील नाराजीचा स्फोट पाहावयास मिळेल, असे भाकित विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी आज (दि.२४) पत्रकार परिषदेत केले. मनसे नेते राज ठाकरे यांना भाजपसोबत घेतल्यास बेरजेचे राजकारण चांगले होईल, असे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले.

दरेकर  (Praveen Darekar) म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरले आहे. समाजातील सर्वच घटक या सरकारच्या कामगिरीवर नाराज आहेत. महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी आहे. या नाराजीचा स्फोट पहायला मिळेल. कर्नाटक, गोवा, गुजरातप्रमाणे महाराष्ट्र सरकारलाही पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करता आले असते; पण महाविकास आघाडीचे सरकार महागाईवरून केवळ केंद्राकडे बोट दाखवत आहे.

Praveen Darekar : बियाणे दुप्पट महागले

दरेकर म्हणाले, बि-बियाणे महागली आहेत. खते उपलब्ध होत नाहीत. विदर्भ, मराठवाड्यात तीस किलोच्या महाबीजच्या सोयाबीन बियाणाचा भाव २ हजार २५० वरून ४ हजार २५० रुपये झाला आहे. खासगी बियाणे कंपन्याही दरवाढ करतील. त्यामुळे शासनाने अनुदान देऊन दरवाढ मागे घ्यावी.

मुंबईचा महापौर भाजपचाच

दरेकर म्हणाले, हिंदुत्वाबाबत भाजपची भूमिका कायम आहे. मनसे नेते राज ठाकरे हे हिंदुत्वाचा मुद्दा घेवून पुढे जात आहेत. राज ठाकरे यांना सोबत घेतले तर भाजपसाठी बेरजेचे राजकारण होईल. दरम्यान, आगामी निवडणुकीत मुंबईचा महापौर भाजपचाच होईल, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

ब्रिजभूषण यांना राष्ट्रवादीकडून रसद

राज ठाकरे यांच्याविरोधात भाजपचे खासदार ब्रिजभूषण यांना राष्ट्रवादीकडून रसद पुरवली असल्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्याविषयी ब्रिजभूषण यांची वक्तव्ये, रोहित पवार यांचे मध्येच दर्शनाला जाणे. या काही बाबींवरून सर्वकाही समजून येते. सापळा काय होता, हे योग्यवेळी समजून येईल, असेही दरेकर म्हणाले.

भाजपचे ब्रिजभूषण यांच्यासंदर्भात भाजपचे केंद्रीय नेते योग्य निर्णय घेतील. भाजपने त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिलेला नाही, असेही दरेकर यांनी स्‍पष्‍ट केले. या वेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, माजी आमदार दिनकर पाटील, भाजप नेते शेखर इनामदार, संगीता खोत, दीपक माने, केदार खाडीलकर, अशरफ वांकर उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button