Raigad Tourism Revenue Pudhari
रायगड

Raigad Tourism Revenue: पर्यटनाचा बूस्टर! रायगडमध्ये अवघ्या दहा दिवसांत 60 कोटींची उलाढाल

ख्रिसमस ते नववर्ष स्वागतासाठी अडीच लाख पर्यटक; जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना

पुढारी वृत्तसेवा

रायगड : किशोर सुद

पर्यटनातून रायगड जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला चांगलाच बुस्टर मिळत आहे. ख्रिस्तमस ते नववर्ष स्वागत या पर्यटनदृष्ट्या महत्वाच्या अशा आठ ते दहा दिवसांच्या काळात रायगड जिल्हयात दोन ते अडीच लाख पर्यटकांनी भेट दिली आहे. यातून पर्यटन क्षेत्रातील व्यवसायिकांची कोटयवधींची उलाढाल झाली आहे. केवळ या दहा दिवसात जिल्ह्यात 50 ते 60 कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. रायगडमध्ये पर्यटकांचा ओघ वाढत आहे.

निसर्गाचे वरदान लाभलेल्या रायगड जिल्हा गेल्या काही वर्षात जगभरातील पर्यटकांचे आवडते ठिकाण बनत आहे. धार्मिक, ऐतिहासिक, विलोभनिय निसर्ग संपदा आणि सुंदर समुद्र किनारे ही रायगड जिल्ह्याच्या पर्यटन स्थळांची वैशिष्टये आहेत. पर्यटनासाठी सर्वांच्या पसंतीचा हा जिल्हा आहे. म्हणूनच रायगडमधील अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन येथील समुद्र किनाऱ्यांची भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. स्वच्छ समुद्र किनारा, कुलाबा किल्ला, वॉटरस्पोर्ट यामुळे दरवर्षी लाखो पर्यटक अलिबागला भेट देतात.

रेवदंडा, नागाव, आक्षी, वरसोली, थळ, नवगाव, किहीम, मांडवा येथील समुद्र किनारे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. हे समुद्र्‌‍किनारा पिकनिक आणि महिनाअखेर सुट्ट्याकरिता लोकप्रिय आहेत. मुरुड तालुकाही सागरी पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा तालुका आहे. मुरुडमधील जंजिरा किल्ला, काशिद बीच, श्रीवर्धनमधील समुद्र किनारे पर्यटनातील केंद्र बिंदू आहेत. त्याचबरोबर माथेरान थंड हवेचे ठिकाणी, ऐतिहासिक गडकिल्ले आणि अष्टविनायकासह विविध धार्मिक आणि अध्यात्मिक ठिकाणांमुळे पर्यटकांचा ओढा रायगडमध्ये वाढत आहे.

रायगड जिल्ह्यासाठी दिवाळी, नाताळ, नववर्ष, होळी आणि मे महिना हा पर्यटनासाठी महत्वाचा कालावधी असतो. याकाळात जिल्हयात सर्वाधिक पर्यटक येत असतात. याच कालावधीमध्ये जिल्हायतील पर्यटन व्यावसायामध्ये मोठी उलाढाल होत असते. नुकत्याच साजऱ्या झालेल्या ख्रिसमस आणि नववर्ष स्वागतालाही राज्यभरातील लाखो पर्यटक रायगड जिल्हयात दाखल झाले. नाताळच्या सुट्टीनिमित्त 24 डिसेंबरपासून पर्यटक रायगड जिल्हयात दाखल होण्यास सुरुवात झाली. नाताळ साजरा करण्यासाठी आणि सुट्टीनिमित्त मौजमजा करण्यासाठी 1 लाखाहून अधिक पर्यटक रायगडात दाखल झाल्याचे पर्यटन व्यावसायिकांकडून सांगितले जाते. तर नववर्ष स्वागतासाठी रायगड जिल्ह्यात दीड ते 2 लाख पर्यटक दाखल झाल्याचा अंदाज पर्यटन व्यावसायिकांकडून व्यक्त केला जात असून पर्यटन क्षेत्रातील लहान-मोठ्या व्यावसायिकांची 50 ते 60 कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज पर्यटन व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.

यावर्षी ख्रिसमस सुट्टी आणि नववर्ष स्वागतासाठी मांडवा ते गेट वे मार्गावर प्रवास करणारे प्रवासी आणि पर्यटकांसाठी चोख नियोजन करण्यात आले आहे. या आठ ते दहा दिवसात पर्यटकांची संख्या वाढत असल्याने सर्व बोटी कंपनी चालकांना बोटी ओव्हरलोड होणार नाहीत, प्रवाशांना लाईफ जॅकेट, पर्यटकांची गर्दी वाढल्यास फेऱ्या वाढविले याबाबत सूचना दिल्या होत्या.
ए.एन. मानकर, बंदर निरीक्षक, मांडवा बंदर

कनेक्टिव्हिटी वाढली

रायगडातील जलवाहतूक, अटल सेतू, महामार्गा आणि राज्य मार्गांची कामे मार्गी लागत आहेत. यामुळे रायगडची कनेक्टिव्हीटी वाढली आहे. एसटी बस सेवाही पर्यटक काळात विशेष गाड्यांचे नियोजन करीत असते. मांडवा ते गेट वे जलमार्गावर लाँचेसच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली जाते. 25 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यानचे मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया या मार्गावर 40 हजार 753 तर गेट वे ते मांडवा दरम्यान 38 हजार 787 प्रवाशांनी प्रवास केला आहे. नऊ दिवसात या मार्गावर 79 हजार 540 प्रवाशांनी प्रवास केला आहे. यामुळे राज्यभरातील पर्यटकांना रायगडमध्ये प्रवास करणे सुलभ आणि आनंददायी ठरत आहे.

25 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यानचे मांडवा ते गेट-वे व गेट-वे ते मांडवा दरम्यानचे प्रवासी

1) मालदार - 23398

2) पीएनपी - 15112

3) अपोलो - 9730

4) अंजठा - 31300

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT