

माणगाव : रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो यांच्या निधीतून आयोजित भारत विकास परिषद कोथरूड व दिव्यांग केंद्र, पुणे यांच्यातर्फे वनवासी कल्याण आश्रम शाळा, उतेखोल, दत्तनगरजवळ माणगाव येथे रविवारी (1 फेब्रुवारी)भव्य मोफत दिव्यांग शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दिव्यांग केंद्राचे विश्वस्त व केंद्रप्रमुख विनय खटावकर यांनी माणगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली. या शिबिरामध्ये पूर्व नावनोंदणी केलेल्या सुमारे 300 दिव्यांग बांधवांना मोफत आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय आणि हात बसविण्यासाठी मोजमाप घेण्यात येणार आहे. भारत विकास परिषद कोथरूड व दिव्यांग केंद्र,पुणे यांचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठरणार आहे.
भारत विकास परिषद ही देशभरातील 37 दिव्यांग केंद्रांपैकी महाराष्ट्रातील पुणे येथील दिव्यांग केंद्र गेल्या 25 वर्षांपासून अखंडपणे कार्यरत आहे. या केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे 5 हजार दिव्यांगांना मोफत कृत्रिम पाय, हात व कॅलिपर बसविण्यात येतात. विशेष म्हणजे, एप्रिल 2025 मध्ये एकाच शिबिरात 829 दिव्यांगांना कृत्रिम पाय बसवून या केंद्राने जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. अशा ख्यातीप्राप्त संस्थेच्या सहकार्याने माणगावात हे शिबिर आयोजित करण्यात आल्याने परिसरातील दिव्यांगांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पत्रकार परिषदेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, माणगावचे कार्यवाह अजित शेडगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी दिव्यांग केंद्राचे विश्वस्त व केंद्रप्रमुख विनय खटावकर आणि विनोद दप्तरदार यांनी शिबिराच्या सविस्तर नियोजनाबाबत तसेच आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायांच्या वैशिष्ट्यांबाबत माहिती दिली. माहिती देताना त्यांनी सांगितले की, आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायाची बाजारातील किंमत 50 हजार रुपयांपेक्षा अधिक असते. असे उच्च दर्जाचे कृत्रिम पाय या शिबिरात 300 दिव्यांगांना पूर्णतः मोफत देण्यात येणार आहेत.
रायगड, रत्नागिरी व शेजारच्या जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी फोनद्वारे पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. पूर्व नोंदणीशिवाय शिबिरात प्रवेश दिला जाणार नाही, संपर्कासाठी विनोद 9881138052 चंद्रशेखर 98230 24232 सदर शिबिर वनवासी कल्याण आश्रम शाळा, उतेखोल, माणगाव येथे 1 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे.
पारंपरिक जयपूर फूटच्या तुलनेत हे ऑर्थोपेडिक, वजनाने हलके, टिकाऊ व अधिक कार्यक्षम आहेत. हे कृत्रिम पाय बसवल्यानंतर दिव्यांग व्यक्ती चालणे, पळणे, पोहणे, उडी मारणे, वाहन चालविणे तसेच शेतीसह दैनंदिन कामे सहज करू शकतात. तज्ञ डॉक्टर व तांत्रिक कर्मचाऱ्यांकडून आवश्यक ते प्रशिक्षण व मार्गदर्शनही दिले जाणार आहे.