

महाड : किल्ले प्रतापगड...युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यातील एक महत्वाचा किल्ला.याच किल्ल्यावर तळ ठोकून शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या विजापूरचा मातब्बर सरदार अफझलखान याचा वध करुन आपली शक्ती दाखवून दिली होती.याच किल्ल्यावर तुळजाभवानीची सुंदर मूर्तीही प्रतिष्ठापित करण्यात आली होती.
निसर्गाचे वरदान लाभलेल्या आणि जावळी खोऱ्यात वसलेल्या या प्रतापगड परिसरावर निसर्गाने सौंदर्याची जणू मुक्तहस्ते उधळणच केलेलीआहे.याच सौंदर्याला आपल्या कॅमेऱ्यात क्लीक,क्लीक करत महाडच्या युवा छायाचित्रकार कल्पेश पाटील यांनी आंतरराष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा जिंकली आहे. श्री ज्ञानपीठ इंटरनॅशनल आयोजित फोटोग्राफीची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेसाठी थीम ही युनोस्को हेरिटेजचे 12 किल्ले ही थीम देण्यात आली होती. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे रुपये 15 हजाराचे पारितोषिक महाडच्या कल्पेश गणेश पाटील या युवा छायाचित्रकाराने जिंकले .
पारितोषिक वितरण समारंभ नुकताच काशिनाथ धीरू हॉल दादर मुंबई सभागृहात आयोजित करण्यात आला. स्पर्धेमध्ये एकूण236 जणांनी सहभाग नोंदविली. या स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या पारितोषिकमध्ये प्रथम क्रमांक 15 हजार द्वितीय क्रमांक 10 हजार तृतीय क्रमांक 5000 हजार व प्रोत्साहन पर 1हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते युनेस्को हेरिटेज 12 किल्ल्यांकरीता ठेवण्यात आलेल्या या तीनमध्ये महाडच्या कल्पेश गणेश पाटील यांनी काढलेल्या किल्ले प्रतापगड या किल्ल्याच्या छायाचित्राला सर्वोत्कृष्ट छायाचित्र म्हणून गौरविण्यात आले. मुंबई येथील झालेल्या पारितोषिक समारंभात या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक कल्पेश गणेश पाटील यास डॉ. हेमंतराजे गायकवाड, पुरातत्व वस्तुसंग्रहालय संचालनालय महाराष्ट्र राज्याचे डॉ.तेजस गर्गे, शंभू व्याख्यानकार अक्षय तांडेल व मेजर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
मागील आठ ते दहा वर्षापासून कल्पेश पाटील हा फोटोग्राफी करीत असून महाड परिसरातील अनेक ऐतिहासिक स्थळांची त्यांनी केलेले चित्र नागरिकांच्या पसंतीस उतरले आहे. मागील काही वर्षात कल्पेश गणेश पाटील यांनी केलेल्या फोटोग्राफीतील आमुलाग्र कामगिरीबद्दल महाड तसेच रायगड जिल्ह्यातील मान्यवरांकडून व विविध संस्थांकडून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.