

अलिबागः रायगडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकांदरम्यान झालेल्या रक्तपाताच्या पार्श्वभूमीवर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने आतापासूनच कंबर कसली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कोणत्याही शांतता भंग करणाऱ्या घटकांना सहानुभूती दाखवली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिला आहे.
मागील वर्षभरात रायगड जिल्ह्यात पोलीस विभागाने मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून, एकूण 10 हजार 519 व्यक्तींवर विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय, कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या 14 जणांना जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्यात आले आहे. आगामी निवडणूक कालावधी लक्षात घेता आणखी 11 हद्दपारीचे प्रस्ताव सध्या दाखल करण्यात आले असून, त्यावर प्रक्रिया सुरू आहे. रायगड जिल्हा परिषद निवडणुका नेहमीच राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप आणि कधी कधी हिंसाचारामुळे चर्चेत राहिलेल्या आहेत. सद्याची राजकीय परिस्थिती पाहता, हे वाद टाळणे आणि निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पाडणे हे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. यासाठी जिल्ह्यातील काही संवेदनशील ठिकाणांची ओळख पटवण्यात आली असून, त्या भागांतील राजकीय हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रायगड पोलीस दलाचा वार्षिक आढावा सादर करताना पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी ही माहिती दिली. त्यांच्या कार्यक्षेत्रात जिल्ह्यातील एकूण 59 पैकी 48 मतदारसंघ (गट) तसेच पंचायत समितीचे 96 गण येतात. यापैकी कर्जत आणि महाड हे तालुके सध्या अधिक संवेदनशील ठरले असून, तेथे विशेष दक्षता घेण्यात येणार आहे.
सरत्या वर्षात शहरी भागातील निवडणुकींच्या पार्श्वभूमिवर 10 हजार 519 प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आलेल्या आहेत. नवीन वर्षात जिल्हा परिषद, पंचायत समीत्यांच्या निवडणुका असल्याने गुन्ह्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलीस प्रशासन सर्वोतोपरी खबरदारी घेत आहे. या निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.
आंचल दलाल, जिल्हा पोलीस अधीक्षक-रायगड
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असल्याने, पोलीस प्रशासनाला सतत सतर्क राहावे लागणार आहे. निवडणूक विभागाकडून तयारी अंतिम टप्प्यात आलेली असताना, पोलीस विभागानेही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गस्त वाढवणे, गुप्त माहिती संकलन, तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. शांततापूर्ण व पारदर्शक निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.