

अलिबाग :
अलिबाग तालुक्यातील मापगाव-मुशेत तेथील कुकूचकू कंपनीचे मालक कुणाल पाथरे यांच्या घरावर 8 ते 9 जणांनी सशस्त्र दरोडा टाकीत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने, मोबाईल असा सुमारे 18 लाख 22 हजार रुपये किंमतीचा ऐवज लुटला होता. या दरोड्याप्रकरणी अलिबाग पोलीस व रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने संयुक्त कारवाई करीत सात आरोपींना भिवंडी येथून ताब्यात घेतले आहे.
मापगाव येथील पाथरे यांच्या घरावर शनिवारी (3 जानेवारी) मध्यरात्री आठ ते नऊजणांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. दरोडेखोरांनी पाथरे यांच्या घरातील काही मंडळींना डांबून ठेवण्याबरोबरच पेट्रोल अंगावर टाकून जीवे ठार मारण्याची धमकीही दिली होती. पाथरे कुटुंबियांना धमकावून घरातील दागिने व रोकडसह 18 लाख 22 हजार रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत फर्णे यांच्याकडे तपास सोपविण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. अलिबाग पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने संयुक्तरित्या तपास सुरु केला. सीसीटीव्ही कॅमेरांसह वेगवेगळ्या माध्यमातून दरोडेखोरांचा शोध घेण्यात आला. अखेर या दरोड्यातील सात आरोपींना भिवंडी येथून ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींमध्ये रेहमान, इस्माईल, अलताब, सचिन, ओंकी, जावेद यांचा समावेश आहे. पोलिसांकडून आरोपींची पूर्ण नावे मिळू शकलेली नाहीत.
मुशेत गावाच्या हद्दीत कुणाल पाथरे यांचा बंगला असून शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास तब्बल नऊ दरोडेखोरांनी बंगल्याच्या मागील बाजूस असलेल्या वॉल कंपाउंडवरील तारांचे जाळे तोडून आवारात प्रवेश केला. त्यानंतर मागील बाजूची स्लायडिंग विंडो उघडून लोखंडी ग्रीलला लावलेले कुलूप व कडी- कोयंडा हत्यारांच्या साहाय्याने तोडून ते घरात शिरले. घरातील खोल्यांची झडती घेत असताना दरोडेखोरांपैकी काहींनी लहान आयान पाथरे याला शस्त्राचा धाक दाखवून घराबाहेरील आवारात नेले. त्याठिकाणी त्याच्यावर हत्यार उगारून त्यांनी घरातील साथीदारांशी मोबाईलद्वारे संपर्क साधला.
बंगल्याच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दरोडेखोर चारचाकी वाहनाने आल्याचे तसेच मार्ग दाखवण्यासाठी एक दुचाकी वापरण्यात आल्याचे स्पष्ट होते. घटनेनंतर रायगड पोलिसांची अत्यंत जलदगतीने चक्रे फिरवून सात आरोपींना ताब्यात घेतले आहे. घटना स्थळावर फॉरेन्सिक टीमने भेट देऊन तपास सुरु केला आहे. त्यामुळे उर्वरित आरोपींनाही लवकरत ताब्यात घेण्यात यश येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मुशेत दरोड्यात आणखी कोण-कोण सहभागी आहे, पाथरे यांच्या बंगल्याची रेकी केली होती का, आदी बाबी समोर येण्याची शक्यता आहे.