अलिबाग : सुवर्णा दिवेकर
महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. त्याचा परिपाक म्हणूनच जिह्यातील ग्रामपंचायतींच्या घरपट्टी वसुलीत या अभियानादरम्यान लक्षणीय वाढ झाली आहे. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात सप्टेंबर ते डिसेंबर 2025मध्ये ग्रामपंचायतींची तब्बल 90 कोटी 77 लाखांची वसुली आहे. या वसुलीमुळे ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार आहे.
रायगड जिल्ह्यात शासनाच्या समृद्ध पंचायत राज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची घरपट्टीची मोठी थकबाकी राहिल्याने या अभियानांतर्गत थकबाकी भरणासाठी ग्रामपंचायतींतर्फे विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायतींना सोमवारी व शनिवारी असे दोन दिवस घरपट्टी भरणासाठी कॅम्प आयोजित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. या विशेष कॅम्पचा लाभ मोठ्या संख्येने नागरिकांनी घेउन अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला.
अभियान कालावधीतच 13 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीमुळे अनेक प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. या लोकअदालतीमध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून घरपट्टीची एकूण 27 हजार 341 प्रकरणे ठेवण्यात आली. यातील 8 हजार 316 प्रकरणांचा निपणारा करून 6 कोटी 80 लाख 14 हजार 963 रुपयांची घरपट्टी वसूल होण्यास मदत झाली.
रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यावर विशेष भर दिला जात आहे. वाढीव घरपट्टी वसुलीमुळे ग्रामपंचायतींना मूलभूत सुविधा, विकासकामे व लोकहिताच्या योजना अधिक प्रभावीपणे राबविता येणार आहे.
पाणीपट्टी वसुलीतही एप्रिल ते डिसेंबर 2025 दरम्यान 50.56 टक्के वसुली झाली असून समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे 9 कोटींची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे लोकअदालतीमध्ये पाणीपट्टीची 6 हजार 689 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील 1 हजार 474 प्रकरणांचा निपटारा झाला असून 1 कोटी 14 लाख 41 हजार 550 रुपयांची वसुली झाली आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून एप्रिल ते डिसेंबर 2025 या कालावधीत तब्बल 62 टक्के घरपट्टी वसुली करण्यात आली आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामुळे घरपट्टी वसुलीला गती मिळाली आहे. अभियानाची मुदत आता 31 मार्चपर्यंत वाढली असून हे आर्थिक वर्ष संपेपर्यंत म्हणजे पुढील तीन महिन्यात ही वसुली किमान 90 टक्क्यांपर्यंत करण्याचा आमचा मानस आहे. त्याप्रमाणे ग्रामपंचायतींनाही सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामस्थांनीही ग्रामपंचायतींना घरपट्टी भरून सहकार्य करावे.नेहा भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद