

श्रीवर्धन ः श्रीवर्धन तालुक्याची ओळख असलेली कडव्या वालासह विविध कडधान्यांची शेती आज हळूहळू इतिहासजमा होताना दिसत आहे. भात कापणीनंतर जमिनीत शिल्लक राहणाऱ्या नैसर्गिक ओलाव्यावर वाल, चवळी, मूग, उडीद यांसारखी कडधान्ये घेण्याची परंपरा कोकणात जोपासली जात होती. विशेषतः कडव्या वालाचे पीक हे केवळ आर्थिक नव्हे, तर सांस्कृतिक आणि खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग होते. मात्र मागील काही वर्षांत मोकाट घोडे आणि गुरांच्या वाढत्या त्रासामुळे शेतकऱ्यांनी ही शेती जवळपास बंद केली आहे.
कोकणात आणि रायगड जिल्ह्यात गावठी कडव्या वालाच्या शेंगांपासून तयार होणारी ‘पोपटी’ आजही चवीचा राजाच मानली जाते.मात्र वालाच्या कमतरतेने पोपटीवरही मर्यादा येऊ लागल्या आहेत.
या गंभीर प्रश्नाबाबत श्रीवर्धन नगरपरिषद आणि संबंधित प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र घोडेमालकांवर किंवा मोकाट जनावरांवर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. मोकाट घोड्यांमुळे केवळ शेतीचे नुकसान होत नाही, तर शहरातील रस्त्यांवर घाण पसरून आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत आहे.
एकूणच, मोकाट घोडे आणि गुरांचा प्रश्न सुटला नाही, तर श्रीवर्धन तालुक्यातील कडव्या वालासह पारंपरिक कडधान्य शेती पूर्णपणे नामशेष होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेती, पर्यटन आणि स्थानिक संस्कृती यांचा समतोल राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर निर्णय घेण्याची गरज असल्याची जोरदार मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे.
मोकाट घोड्यांचा उच्छाद
तालुक्यात पर्यटन व्यवसाय झपाट्याने वाढल्यानंतर समुद्रकिनाऱ्यांवर घोडेस्वारी आणि घोडागाडी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. रोजगाराच्या दृष्टीने हा व्यवसाय महत्त्वाचा असला तरी त्याचे दुष्परिणाम आता ग्रामीण शेतीवर स्पष्टपणे दिसू लागले आहेत. दिवसभर पर्यटकांना फिरविल्यानंतर अनेक घोडेमालक आपले घोडे घरी बांधून ठेवण्याऐवजी मोकाट सोडतात. परिणामी हे घोडे शहरासह ग्रामीण भागात शेतांमध्ये शिरून उभी पिके फस्त करतात. कितीही मजबूत कुंपण घातले तरी घोडे आणि मोकाट गुरे त्यावरून उडी मारून शेतात शिरतात. विशेषतः कडव्या वालासारखी नाजूक वेलवर्गीय पिके काही तासांत पूर्णपणे नष्ट होतात. वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे खर्च वाढतो, उत्पादन हातातून जाते आणि शेवटी शेती करणेच परवडत नाही, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.