रायगड

Third Mumbai development: अटल सेतूपासून गावकुसापर्यंत रायगडचा विकासवेग; ‘तिसऱ्या मुंबई’च्या उभारणीला नवी दिशा

स्वातंत्र्यदिन सोहळ्यात मंत्री भरत गोगावले यांचा विकासाचा रोडमॅप; शेतकरी, महिला, युवक आणि जलसंधारणाला प्राधान्य

पुढारी वृत्तसेवा

सुवर्णा दिवेकर

अलिबाग : अटल सेतू, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, सागरी मार्ग आणि विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे रायगड जिल्ह्याच्या विकासाला नवी गती मिळत आहे. भविष्यात रायगडमध्ये 'तिसरी मुंबई' आकारास येत आहे. या विकासाला लोकसहभागाची जोड देऊन विकसित रायगड साकारण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे; असे प्रतिपादन रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी केले.

अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावर भारतीय स्वातंत्र्याच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभात मंत्री गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना अभिवादन करून मंत्री गोगावले यांनी रायगडच्या विकासाचे विविध पैलू मांडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्यातील १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश होणे ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या खात्यात १० कोटी ९५ लाख

शेतकरी हा विकासाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगत मंत्री गोगावले यांनी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’च्या अंमलबजावणीची माहिती दिली. जिल्ह्यात २ हजार ८०० हून अधिक शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण पूर्ण झाले असून, १ हजार ८५९ शेतकऱ्यांच्या खात्यात १० कोटी ९५ लाख रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत आहे.

ग्रामपंचायतींची राष्ट्रीय स्तरावर मोहर

रायगडच्या ग्रामविकासाचीही यावेळी दखल घेण्यात आली. खालापूर तालुक्यातील खरीवली ग्रामपंचायतीने जलसमृद्ध श्रेणीत देशात प्रथम, चांभारलीने सामाजिक सुरक्षेत देशात द्वितीय, वासांबेने आत्मनिर्भर पंचायत श्रेणीत देशात प्रथम, तर अलिबाग तालुक्यातील वाडगाव ग्रामपंचायतीने आदिशक्ती अभियानात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे रायगडच्या ग्रामीण विकासाची देशपातळीवर छाप उमटल्याचे मंत्री गोगावले यांनी नमूद केले.

४ लाख ७६ हजार महिलांना थेट लाभ

महिलांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यात १५१ हेल्पलाईन आणि १६ हिरकणी कक्ष कार्यरत आहेत. ‘लाडकी बहीण’ योजनेचा ४ लाख ७६ हजार महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ थेट मिळत आहे. युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ राबविण्यात येत आहे.

‘वॉक फॉर वॉटर’मधून जलसंधारणाचा संदेश

माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या स्मृतीनिमित्त १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह साजरा केला जात आहे. २१ ऑगस्ट रोजी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले आहे. पाण्याचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा आणि ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संकल्प करावा, असे आवाहन मंत्री गोगावले यांनी केले. यावेळी जलसंधारण सप्ताहाच्या लोगोचे अनावरण करून उपस्थितांना जलप्रतिज्ञा देण्यात आली. उल्लेखनीय कामगिरी करणारे पोलीस अधिकारी-कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत करणाऱ्या ‘आपदा मित्रांचा’ सन्मान करण्यात आला.

दरम्यान, मुख्य शासकीय समारंभानंतर मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते वरसोली येथील जिल्हा परिषद शाळेत अत्याधुनिक ‘इंग्लिश लँग्वेज लर्निंग लॅब’चे लोकार्पण करण्यात आले. पायाभूत सुविधा, शेती, रोजगार, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास या सर्व क्षेत्रांचा समतोल साधत रायगडला भविष्यातील विकसित जिल्हा बनविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT