

किशोर सुद
अलिबाग: १ ऑगस्टपासून खोल समुद्रातील मासेमारीवरील बंदी शिथिल करण्याची घोषणा राज्य शासनाने केली तरी या मासेमारीला अद्याप वेग आलेला नाही. केंद्र सरकारने यावर्षीपासून १२ नाॅटीकलपुढील मासेमारीसाठी सुरु केलेले 'एक्सेस पास' रायगड जिल्ह्यातील फक्त १०२ मच्छीमारी नाैकांना मिळाले असल्याने याच बोटी खोली समुद्रातील मच्छीमारीला जाऊ शकतात.
या शिवाय परप्रांतिय कामगारांची अनुपलब्धता, मासेमारीच्या तयारीसाठी न मिळालेला वेळ, वादळी वातावरण यामुळे अद्यापही खोल समुद्रातील मासेमारीसमोर अडचणी आहेत. येत्या 16 आॅगस्टपासून खऱ्या अर्थाने मासेमारी सुरु होईल असा विश्वास मच्छीमारांकडून व्यक्त होत आहे.
रायगड जिल्हयातील अलिबाग, उरण, मुरुड आणि श्रीवर्धन या किनारी तालुक्यात समुद्र मासेमारी होते. जिल्हयात १९५ गावांमधून १ लाख १३ हजार मच्छीमार समाज बांधव आहेत. चार तालुक्यात ४ हजार २०० यांत्रिकी तर १७०० बिगर यांत्रिकी नाैकांद्वारे मच्छीमार होते. रायगड जिल्ह्यात वार्षिक सुमारे ४० हजार मेट्रिक टन मत्स्य उत्पादन होते.
प्रत्यक्ष मत्स्य व्यवसाय व त्यावर अवलंबून असलेल्या व्यवसाय व कामगारांची मोठी संख्या आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या विकासात मत्स्य व्यवसायाचा मोठा वाटा आहे. मत्स्य व्यवसाय बंद राहिल्यास मोठा वर्ग उत्पन्नापासून वंचित राहतो.
जून ते जुलै महिन्यातील मासेमारी बंदीमुळे मच्छीमार व्यवसायावर अवलंबून राहणाऱ्यांना रोजगारापासून वंचित रहावे लागते. त्यासाठी मच्छीमारी बंदी उठण्याची मच्छीमारांना प्रतीक्षा असते. दरवर्षी जून आणि जुलै महिन्यांत माशांचा प्रजनन व अंडी घालण्याचा काळ असल्याने तसेच समुद्र खवळलेला असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने १ जून ते ३१ जुलै या कालावधीत खोल समुद्रातील मासेमारीवर बंदी घालण्यात येते.
यावर्षी महाराष्ट्र शासनाने सुरुवातीला मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत जाहीर केला होता. मात्र, मत्स्यव्यवसाय मंत्र्यांनी २९ जुलै रोजी घेतलेल्या निर्णयानुसार १२ नॉटिकल मैलांपलीकडे मासेमारी करणाऱ्या नौकांना १ ऑगस्टपासून बंदीतून सूट देण्यात आली. १ ऑगस्टपासून खोल समुद्रातील मासेमारीवरील बंदी शिथिल करण्याची घोषणा राज्य शासनाने केली तरी या मासेमारीला अद्याप वेग आलेला नाही.
केंद्र सरकारने यावर्षीपासून १२ नाॅटीकलपुढील मासेमारीसाठी सुरु केलेले एक्सेस पास रायगड जिल्ह्यातील फक्त १०२ मच्छीमारी नाैकांना मिळाले असल्याने याच मासेमारी बोटी खोली समुद्रातील मच्छीमारीला जाऊ शकतात.
उर्वरित मच्छीमारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. या शिवाय परप्रांतिय कामगारांची अनुपलब्धता, मासेमारीच्या तयारीसाठी न मिळालेला वेळ, वादळी वातावरण यामुळे अद्यापही खोल समुद्रातील मासेमारीसमोर अडचणी आहेत. येत्या १६ ऑगस्टपासून खऱ्या अर्थाने मासेमारी सुरु होईल असा मच्छीमारांकडून व्यक्त होत आहे.
बारा नाॅटीकलपलीकडील ह्ददीत मासेमारी करण्यासाठी केंद्र सरकारने या वर्षीपासून एक्सेस पास देणे सुरू केले आहे. बारा ते दोनशे नाॅटीकलदरम्यान या पासद्वारे मच्छीमारी करता येऊ शकते. एक्सेसपाससाठी मोठ्या प्रमाणात मच्छीमारांनी आॅनलाईन अर्ज केले आहेत. रायगड मत्स्य विभागाकडून ते पुढे पाठविण्यात आले असून रायगड जिल्ह्यातील फक्त १०२ मच्छीमारांना आतापर्यंत एक्सेस पास मिळाले आहेत. तर राज्यातील ६०२ मच्छीमारांना हे पास मिळाले आहेत. एक्सेसपास मिळालेले मच्छीमार १ आॅगस्टपासून १२ नाॅटीकलपुढे मच्छीमारी करू शकतात.
- महेश खरात, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, रायगड
अलिबाग बंदर परिसरात सुमारे २०० मच्छीमारी नाैका आहेत. त्यातील सुमारे ५० ते ५५ नाैकाच १२ नाॅटीकल्या पलीकडे जाऊन मच्छमारी करीत असतात. शासनाने अचानक १ आॅगस्टपासून मच्छीमारी सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र मच्छीमारीसाठी लागणारा कामगार वर्ग अद्याप आलेला नाही. सध्याचे वादळी वातावरण असून मासेमारीची तयारी झालेली नाही. नाैका १२ नाॅटीकलच्या आतच मच्छिमारी करीत असतात. त्यामुळे बोट मच्छीमारीसाठी गेलेली नाही. १६ ऑगस्टपासूनच मच्छीमारीला सुरुवात होईल.
- विजय भगत, अध्यक्ष, अलिबाग मच्छिमार सहकारी सोसायटी लि.