

उरण : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्वर्गीय अजितदादा पवार माजी उपमुख्यमंत्री यांच्या जयंतीनिमित्त उरण तालुक्यातील खोपटे येथील रायगड जिल्हा परिषद शाळा येथे आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील ५५० शेतकऱ्यांना मत्स्यबीजाचे वाटप करण्यात आले. रायगड जिल्ह्याचा 'वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट' म्हणून सागरी मत्स्य उत्पादनाचा समावेश करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जावळे यांनी यावेळी दिली.
यावेळी मत्स्यपालन क्षेत्राचा विकास हा रायगड जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा असून शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन, प्रशिक्षण, वित्तीय सुविधा आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे, तहसीलदार उद्धव कदम, तालुका कृषी अधिकारी अर्चना सूळ, पंचायत समिती सदस्या कविता पाटील, तारपोवाला सागरी जीव शास्त्र केंद्राचे डॉ. भरत यादव, डॉ. रवींद्र बोंद्रे, प्रारंभी गावंड तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी प्रस्ताविकात उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. 'आत्मा' प्रकल्पांतर्गत मत्स्यबीज उपलब्ध करून देण्यात आले असून लाभार्थी शेतकऱ्यांना मत्स्यपालनाबाबत प्रशिक्षणही देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्हाधिकारी जावळे म्हणाले की, रायगड जिल्ह्याला १२२ किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असून मत्स्य उत्पादन वाढविण्याची मोठी क्षमता आहे. जिल्ह्याचा मोठा भूभाग डोंगराळ व जंगलव्याप्त असल्याने पारंपरिक शेतीच्या विस्ताराला मर्यादा आहेत. त्यामुळे सागरी तसेच गोड्या पाण्यातील मत्स्यपालनाला चालना देऊन शेतकऱ्यांना उत्पन्नाचा शाश्वत पर्याय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील साडेपाचशे शेतकऱ्यांना मत्स्यबीजाचे वितरण करण्यात आले असून त्यांना पूर्वप्रशिक्षणही देण्यात आले आहे. आगामी काळात मत्स्यपालनाचे तंत्रज्ञान, खाद्य व्यवस्थापन, रोगनियंत्रण, उत्पादन व्यवस्थापन, मूल्यवर्धन, प्रक्रिया उद्योग आणि विपणन याबाबत तालुकानिहाय प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच शेततळे व बायोफ्लॉक तंत्रज्ञानालाही प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई महानगर प्रदेश, जवाहरलाल नेहरू बंदर (जेएनपीटी) आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे मत्स्य उत्पादनासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध असून प्रक्रिया उद्योग व निर्यातीच्या माध्यमातून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीची संधी असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्हाधिकारी जावळे यांनी सागरी मच्छीमारांच्या आर्थिक अडचणींचाही उल्लेख केला. मासेमारीसाठी आवश्यक भांडवल उपलब्ध नसल्यामुळे अनेक कोळी बांधवांना खासगी सावकारांकडून जादा व्याजदराने कर्ज घ्यावे लागते. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रमुख कोळीवाड्यांमध्ये बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असून अलिबाग तालुक्यातील आक्षी येथे बँक ऑफ बडोदाची शाखा सुरू करण्यात आली आहे. भविष्यात जिल्ह्यातील इतर प्रमुख कोळीवाड्यांमध्येही अशा सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
५५० शेतकऱ्यांना मत्स्यबीज वाटप
रायगड जिल्ह्याचा 'वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट' म्हणून सागरी मत्स्य उत्पादनाचा समावेश करण्यात आला असून उत्पादनवाढ, मूल्यवर्धन आणि निर्यात वाढीसाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जावळे यांनी यावेळी केले. उरण तालुक्यातील खोपटे येथे आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील ५५० शेतकऱ्यांना मत्स्यबीजाचे वाटप करण्यात आले.