रायगड

Raigad accident : सायन-पनवेल महामार्गावर खारघर येथे भीषण अपघात; अग्निशमन जवानांनी चालकाला दिले जीवदान

हिरानंदानी पुलावर आयशर टेम्पो डिव्हायडरवर आदळला; हायड्रोलिक उपकरणांच्या मदतीने चालकाची सुखरूप सुटका

पुढारी वृत्तसेवा

विक्रम बाबर

पनवेल : सायन-पनवेल महामार्गावर खारघर येथे हिरानंदानी समोरील पुलावर आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला. दरम्यान केबिनमध्ये अडकलेल्या गंभीर जखमी चालकाची खारघर मधील सिडको अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून सुखरूप सुटका केली. हा अपघात बुधवारी (दि. २) मध्यरात्री १२.१२ वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे लेनवर घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पो (एमएच ४३ सीई ७७३६) हा वाशी येथील त्रिमूर्ती ट्रेडिंग अँड ट्रान्सपोर्टचा असून, तो पुलावर आडवा होऊन रस्त्याच्या डिव्हायडरला जोरदार धडकला. धडकेची तीव्रता एवढी होती की, टेम्पोची केबिन पूर्णपणे चेपली गेली. त्यामुळे चालक अस्लम खान हे केबिनमध्ये गंभीररीत्या अडकले होते. अपघातानंतर त्यांच्या वेदनेने विव्हळण्याचा आवाज घटनास्थळी उपस्थित नागरिकांना ऐकू येत होता.

घटनेची माहिती मिळताच सिडको अग्निशमन केंद्र, खारघर येथील पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी परिस्थितीचा आढावा घेत बचावकार्य सुरू केले. केबिनचा भाग मोठ्या प्रमाणात चेपल्याने चालकाला बाहेर काढणे अत्यंत आव्हानात्मक होते. जवानांनी स्प्रेडर या हायड्रोलिक उपकरणाच्या साहाय्याने वाहनाचा दरवाजा उघडून चालकाचा एक पाय मोकळा केला. त्यानंतर हायड्रोलिक जॅकच्या मदतीने डॅमेज झालेले स्टेअरिंग आणि केबिनचा भाग बाजूला करण्यात आला.

सुमारे काही काळाच्या अथक प्रयत्नांनंतर चालकाचा दुसरा पाय तसेच संपूर्ण शरीर केबिनमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात जवानांना यश आले. गंभीर जखमी असलेल्या अस्लम खान यांच्या दोन्ही पायांना तसेच तोंडाला दुखापत झाली आहे. सुटका केल्यानंतर त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.

या बचावकार्यात सिडको अग्निशमन दल, खारघरचे अग्निशमन प्रणेता प्रशांत दरेकर, फायरमन जी. आर. तांडेल, जे. वाय. कोळी, के. वाय. पाटील, ए. एस. वाघ, एन. आर. पाटील तसेच यंत्रचालक डी. डी. पाटील यांनी सहभाग घेतला. घटनास्थळी खारघर पोलिस ठाण्याचे कर्मचारीही उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT