

रायगड: औद्योगिक जिल्हा असलेल्या रायगड जिल्ह्यात रासायनिक वायू गळती आणि स्फोटांच्या घटनांमुळे औद्योगिक पट्टा अत्यंत संवेदनशील बनला आहे. गेल्या सहा वर्षात महाड, रोहा धाटाव आणि पाताळगंगा या औद्योगिक क्षेत्रांमध्ये (एमआयडीसी) रासायनिक वायू गळती आणि संबंधित स्फोटांमुळे सुमारे ३५ कामगार व नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. तर १५० हून अधिक कामगार आणि स्थानिक रहिवासी विषारी वायूच्या प्रभावामुळे गंभीर जखमी अथवा बाधित झाले आहेत.
महाडमधील ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीत गेल्या नोव्हेंबर २०२३ मध्ये रासायनिक गॅस गळतीनंतर भीषण आग लागून स्फोट झाला. या दुर्घटनेत ११ कामगारांचा होरपळून व गुदमरून मृत्यू झाला, तर ७ ते ८ कामगार गंभीर जखमी झाले.
धाटाव-रोहा एमआयडीसीतील साधना नायट्रोकेम कंपनीत सप्टेंबर २०२४ मध्ये टँकजवळ काम सुरू असताना मिथेनॉल वायूची अचानक गळती होऊन स्फोट झाला. या दुर्घटनेत ३ कामगारांचा मृत्यू झाला आणि ४ कामगार जखमी झाले होते.
महाड एमआयडीसीमधीलच प्रासोल केमिकल्स कंपनीत आॅक्टोबर २०२३ मध्ये साठवणूक टाकीतून हायड्रोजन सल्फाईड वायूची अचानक गळती होऊन १ कामगाराचा मृत्यू झाला आणि ४ कामगार गंभीर बाधित होऊन बेशुद्ध झाले. येथीलच अन्य एका कंपनीत नोव्हेंबर २०२२ मध्मे उत्पादन प्रक्रियेदरम्यान सुरक्षेच्या त्रुटींमुळे विषारी वायूची गळती झाली. यात गॅसची थेट बाधा झाल्याने १ कामगाराचा मृत्यू झाला, तर २ जण गंभीर जखमी झाले.
महाड, पाताळगंगा आणि धाटाव औद्योगिक क्षेत्रांतील विविध कंपन्यांमध्ये ॲमोनिया, क्लोरीन आणि इतर घातक रसायनांच्या गळतीच्या लहान-मोठ्या घटना घडल्या आहेत. या काळात पाइपलाइन व व्हॉल्व्ह खराब झाल्यामुळे झालेल्या गळतींमध्ये अंदाजे नऊ कामगारांचा जीव गेला, तर ८० हून अधिक स्थानिक नागरिक व कामगार बाधित झाले.
सुरक्षा यंत्रणेचा आणि ऑडिटचा अभाव
कंपन्यांमधील जुने व्हॉल्व्ह, गंजलेल्या पाइपलाईन्स आणि प्रेशर रिलीज सिस्टीमची नियमित तांत्रिक तपासणी न होणे हे अपघातांचे प्रमुख कारण ठरत आहे. आपत्कालीन परिस्थितीत कामगारांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असणारे योग्य गॅस मास्क, ऑक्सिजन सिलिंडर आणि पीपीई किट वेळेवर उपलब्ध नसतात.
एमआयडीसी क्षेत्राच्या अतिशय जवळ असलेल्या रहिवासी भागांपर्यंत विषारी वायू पसरल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना डोळ्यांची जळजळ, मळमळ आणि श्वसनाचा त्रास होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. दरमहीन्यास सुरक्षा विषयक तपासण्याकरण्यात येतात, मात्र त्या सुयोग्य प्रकारे होतात का याची खातरजमा करणे अनिवार्य झाले असल्याची माहिती औद्योगिक क्षेत्रातील काही अभियंत्यांनीच दिली आहे.