Konkan Heat Wave 2026 Pudhari
रायगड

Konkan Heat Wave 2026: कोकणासाठी या वर्षीचा उन्हाळा अधिक उष्ण, त्रासदायक ठरणार?

जंगलतोड, डोंगर उत्खननाचा पर्यावरणावर परिणाम ः पर्यावरण अभ्यासक डॉ. समीर बुटाला यांचे निरीक्षण

पुढारी वृत्तसेवा

महाड : कोकणाचे हवामान साधारणतः उष्ण व दमट असते. मात्र यंदा सातत्याने वाहणारे थंड वारे, अनेक दिवस स्वच्छ आकाश असल्याने रात्रीची उष्णता थेट अवकाशात निघून जाणे, तसेच जंगलतोड, डोंगर उत्खनन यांसारख्या मानवी हस्तक्षेपामुळे नैसर्गिक उष्णता संतुलन बिघडणे, या कारणांमुळे कोकणातही थंडी तीव्रतेने जाणवत आहे. या वर्षीचा उन्हाळा अधिक उष्ण, कोरडा आणि त्रासदायक ठरू शकतो, असा अंदाज पोलादपूर येथील भूगोल व पर्यावरण विषयाचे अभ्यासक डॉ. समीर बुटाला यांनी व्यक्त केला आहे.

हवामानातील बदल व लांबलेल्या पावसामुळे वातावरणात होणारे परिणामामुळे मागील दोन ते तीन आठवड्यापासून कोकणात अचानक वाढलेल्या थंडीची कारणे परिणाम व पुढील हवामानाचा अंदाज या संदर्भात महाड येथील ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ व अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर समीर बुटाला यांनी व्यक्त केले आहे.

साधारणतः उष्ण व दमट हवामानासाठी ओळखल्या जाणाऱ्या कोकण पट्ट्यात यंदा हिवाळ्याने चांगलाच जोर धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण कोकणात सकाळी व रात्री गारठा, थंड वारे, काही भागांत धुके आणि तापमानात लक्षणीय घट जाणवत आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदाची थंडी अधिक तीव्र असल्याने नागरिकांमध्येही चर्चा सुरू आहे. हवामानशास्त्रीय दृष्टीने यामागे अनेक कारणे असल्याचे तज्ज्ञांकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

भूगोल व पर्यावरण विषयाचे अभ्यासक तसेच सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पोलादपूर (जि. रायगड) येथील विभागप्रमुख प्रा. डॉ. समीर अरुण बुटाला यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. ईशान्य मोसमी वाऱ्यांचा प्रभाव दिसून येत असून सप्टेंबर ऑक्टोबरनंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांची माघार सुरू होते. त्यानंतर उत्तर भारतात तापमान घटल्याने तेथे थंड हवेचा दाब वाढतो. हिमालयीन भागातून ही थंड व कोरडी हवा दक्षिणेकडे वाहू लागते. हेच ईशान्य मोसमी वारे महाराष्ट्र आणि कोकणात पोहोचल्यावर तापमान झपाट्याने खाली येते.

कोकणातही तीव्र थंडी का याबाबत आपले मत व्यक्त करताना डॉक्टर समीर बुटाला यांनी स्पष्ट केले की, कोकणाचे हवामान साधारणतः उष्ण व दमट असते. मात्र यंदा सातत्याने वाहणारे थंड वारे, अनेक दिवस स्वच्छ आकाश असल्याने रात्रीची उष्णता थेट अवकाशात निघून जाणे, तसेच जंगलतोड, डोंगर उत्खनन यांसारख्या मानवी हस्तक्षेपामुळे नैसर्गिक उष्णता संतुलन बिघडणे, या कारणांमुळे कोकणातही थंडी तीव्रतेने जाणवत आहे. यंदाच थंडी अधिक का अशी विचारणा केली असता त्यांनी निदर्शनास आणली की, यंदा थंड हवेचा प्रवाह अधिक काळ टिकून राहिला, पावसाचा कालावधी लांबला आणि ढगांचे प्रमाण कमी झाल्याने रात्री उष्णता टिकली नाही. त्यामुळे थंडीची तीव्रता वाढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

तीव्र थंडी हा मानवी हस्तक्षेपाचा परिणाम

पुढील काळात काय बदल घडतील याबाबत डॉक्टर समीर बुटाला म्हणाले, हवामान तज्ज्ञांच्या मते, ज्या वर्षी हिवाळा अधिक तीव्र असतो त्या वर्षी उन्हाळ्यात तापमान झपाट्याने वाढण्याची शक्यता असते. जमिनीतील ओलावा उन्हाळ्यात लवकर वाफ होतो आणि हवामानातील असमतोलामुळे उष्णतेच्या लाटा (हीट वेव्ह) निर्माण होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे येणारा उन्हाळा अधिक उष्ण, कोरडा आणि त्रासदायक ठरू शकतो. एकंदरीत सध्या कोकणात जाणवणारी थंडी ही केवळ ऋतू बदलाचा परिणाम नसून जागतिक हवामान बदल, समुद्रातील प्रवाहांतील चढ-उतार, पावसाच्या स्वरूपातील बदल, वाऱ्यांची दिशा आणि मानवी हस्तक्षेप यांचा एकत्रित परिणाम आहे. भविष्यात अशा टोकाच्या हवामान बदलांना अधिक वेळा सामोरे जावे लागेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT