रोहे : 2025 मध्ये मध्य रेल्वेने प्रवासी तसेच मालवाहतूक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. संपूर्ण नेटवर्कवरून 1,500 दशलक्षाहून अधिक प्रवाशांची वाहतूक करण्यात आली असून, प्रवासी, कोचिंग व इतर उत्पन्नासह एकूण रु16,110 कोटींपेक्षा अधिक महसूल प्राप्त झाला. मालवाहतूक क्षेत्रातील कामगिरीही भक्कम राहिली असून, वर्षभरात 73.37 दशलक्ष टन मालाची वाहतूक नोंदवण्यात आली.
प्रवाशांच्या सोयीसुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. 2025 दरम्यान विविध स्थानकांवर 21 एस्कलेटर आणि 23 लिफ्ट कार्यान्वित करण्यात आल्या. उपनगरीय संपर्क अधिक सक्षम करण्यासाठी नेरुळ/बेलापूर ते उरण दरम्यान 10 अतिरिक्त उपनगरीय सेवा सुरू करण्यात आल्या. मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मोबाइल यूटीएस सहाय्यकांची सुविधा सुरू केली असून, हातातील उपकरणे व पोर्टेबल प्रिंटरच्या माध्यमातून तात्काळ तिकीट उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या उपक्रमामुळे रोख तसेच डिजिटल दोन्ही प्रकारच्या पेमेंटची सोय उपलब्ध झाली असून, तिकीट रांगांमध्ये लक्षणीय घट होऊन प्रवास अधिक सुलभ झाला आहे.
तिकीट तपासणी मोहिमांदरम्यान अनधिकृत अथवा विनातिकीट प्रवासाच्या 37.55 लाख प्रकरणांचा शोध घेतला असून, यामध्ये रु216.62 कोटींचा दंड वसूल करण्यात आला. यामुळे भाडे शिस्तीचे पालन अधिक बळकट झाले असून प्रवाशांमध्ये शिस्तबद्ध प्रवासाला प्रोत्साहन मिळाले आहे.
नेरुळ/बेलापूर उरण मार्गावर तरघर आणि गव्हाण ही दोन नवीन उपनगरीय स्थानके कार्यान्वित करण्यात आली असून, या मार्गावर 10 अतिरिक्त उपनगरीय सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाढत्या निवासी व औद्योगिक परिसरांना अधिक सुलभ प्रवेश मिळाला आहे. यासोबतच नवनिर्मित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी संपर्कही अधिक मजबूत झाला आहे.
नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी सुमारे रु1500 कोटींच्या तयारीच्या कामांनाही सुरुवात करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेने रेल्वे सुरक्षिततेच्या क्षेत्रात एक मोठा टप्पा गाठला, जेव्हा सर्व पाच विभागांमध्ये कवच लोको चाचण्या पूर्ण केल्या आणि सहा महिन्यांत हे यश गाठणारी पहिले क्षेत्रिय रेल्वे ठरली. या प्रणालीला मध्य रेल्वे नेटवर्कवर राबविण्याची योजना आहे, ज्यासाठी व्यापक कर्मचारी प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी अनुकूल ईएमयू डब्याची सुरुवात, ऑप्टिकल ग्राउंड वायर कम्युनिकेशन प्रणाली, आणि पावसाळ्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी व प्रवासी डब्यांमधील पाण्याच्या पातळीचे रिअल-टाइम निरीक्षण करण्यासाठी पुरस्कार-विजेत्या स्वदेशी उपायांचा समावेश होता.