

Mhasla Ghumeshwar Child Death
म्हसळा : म्हसळा तालुक्यातील मौजे घुमेश्वर (घुम, ता. म्हसळा) येथील १४ वर्षीय शाळकरी मुलगा गर्वांग दिनेश गायकर याच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी तब्बल आठ महिन्यांनंतर न्यायाचा मार्ग मोकळा झाला आहे. उपचारात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी उपजिल्हा रुग्णालय माणगाव आणि म्हसळा येथील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अखेर म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हसळा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता ८ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या गर्वांग यास दिनांक ४ एप्रिल २०२५ रोजी ताप आल्याने त्याचे वडील दिनेश गायकर व चुलते सुरेश गायकर यांनी प्रथम ग्रामीण रुग्णालय म्हसळा येथे उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पुन्हा ताप वाढल्याने त्यास ग्रामीण रुग्णालय म्हसळा येथून उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.
मात्र, माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात संबंधित डॉक्टरांनी योग्य उपचार केले नाहीत ना रुग्णालयात दाखल करून घेतले. उपचाराअभावी कुटुंबीयांनी गर्वांग यास परत घुम येथे घेवून जाण्याची वेळ आली. मात्र ताप न उतरल्याने दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी पुन्हा ग्रामीण रुग्णालय म्हसळा येथे दाखल केले असता सकाळी ८.५४ वाजता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या घटनेनंतर म्हसळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली होती.
सदर प्रकरणाचा सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक एस.पी.रोहिणकर यांनी, स.पो.नि.रविंद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली केला. तपासादरम्यान जिल्हा रुग्णालय अलिबाग रायगड येथील तज्ञ समितीने सादर केलेल्या अहवालात उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथील डॉ.अभिषेक रापते व डॉ.नितिश सावंत यांनी उपचारात गंभीर निष्काळजीपणा केल्याचे स्पष्ट झाले आहे.
या अहवालाच्या आधारे मयत मुलाचे वडील दिनेश सखाराम गायकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार म्हसळा पोलीस ठाण्यात ३० डिसेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र पारखे यांनी वार्तालाप करताना सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे व पोलीस उपनिरीक्षक एस.पी.रोहिणकर करीत आहेत.
एका निष्पाप शाळकरी मुलाच्या मृत्यूने म्हसळा तालुका हादरून गेला होता. तब्बल आठ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर दोषींवर कारवाई सुरू झाल्याने गर्वांगच्या कुटुंबीयांना आणि ग्रामस्थांना दिलासा मिळाला असून आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणावर कठोर कारवाईची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.