मुंबई : पुढारी वृत्तसेवा सीबीआयची धडक कारवाई सुरुच असून सीबीआयने 1 हजार 438.45 कोटी आणि 710.85 कोटींच्या बँक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. याच गुन्ह्यांशी संबंधित मुंबईसह 10 ठिकाणी सीबीआयच्या पथकांनी सोमवारी छापेमारी केली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या तक्रारीवरून मुंबईतील लोखंड आणि अन्य धातूंच्या विक्रीत सक्रीय असलेल्या उषदेव इंटरनॅशनल लिमिटेड, मुंबई या खाजगी कंपनी, तिचे संचालक/जामीनदार असलेले सुमन विजय गुप्ता, प्रतीक विजय गुप्ता यांच्यासह अज्ञात लोकसेवक आणि अन्य आरोपींविरोधात बँकेचे सुमारे 1 हजार 438.45 कोटींचे नुकसान केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेसह सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (आता पीएनबी आणि बँक ऑफ महाराष्ट्र) या चार सदस्य बँकांना या खाजगी/कर्जदार कंपनी आणि तिच्या प्रवर्तक संचालकांनी अज्ञात संस्थांच्या माध्यमातून कथितपणे निधी वळवून, विदेशातील निष्क्रिय संस्थांना विक्री दाखवून, खात्यांच्या पुस्तकांमध्ये फेरफार करून नुकसान केल्याचा आरोप आहे.
कंपनी आणि संबंधीत आरोपींनी ज्या संस्थांनी गेल्या पाच ते नऊ वर्षात व्यवसाय केला नाही, अशा संस्थांना कर्ज आणि आगाऊ रक्कम देऊन बँकेच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. यात आरोपींनी मोठ्याप्रमाणात अटी व शर्तींचे उल्लंघन केले. सीबीआयने या कंपनीसह संबंधीत आरोपींच्या मुंबई आणि पुणे येथील तीन ठिकाणी छापेमारी करुन झाडाझडती घेतली. या कारवाईत सीबीआयच्या अधिकार्यांनी गुन्ह्याशी संबंधीत महत्वाची कागदपत्रे, दस्तएवज आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त केले आहेत.
दुसरा गुन्हा अहमदाबाद येथील खाजगी कंपनी आणि 6 संचालक, अज्ञात खाजगी व्यक्ती/सार्वजनिक सेवक यांच्याविरोधात बँक ऑफ इंडियासह आयडीबीआय, एसबीआय, पीएनबी, शामराव विठ्ठल कोऑपरेटिव्ह बँक लि., आयएफसीआय लि. यांच्या समुहाला सुमारे 710.85 कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपावरुन दाखल करण्यात आला आहे.
या दोन्ही प्रकरणात सीबीआयच्या पथकांनी अहमदाबाद आणि पुणे येथे आरोपींच्या घरासह 7 ठिकाणी छापेमारी केली आहे. या कारवाईतही सीबीआयने गुन्ह्याशी संबंधीत वस्तू, काही मालमत्तेची कागदपत्रे आणि 38 लाख रुपये जप्त केले आहेत.
हेही वाचा