नारायणगावच्या भर वस्तीतील मंदिरात चोरी; एक लाखाचा ऐवज पळविला | पुढारी

नारायणगावच्या भर वस्तीतील मंदिरात चोरी; एक लाखाचा ऐवज पळविला

नारायणगाव, पुढारी वृत्तसेवा: नारायणगावच्या भर वस्तीतील तसेच मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या लक्ष्मीनारायण मंदिराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे १ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पळविला. ही घटना सोमवारी ११ जुलैला पहाटे तीन वाजता घडली. या घटनेत अज्ञात चोरट्यांनी लक्ष्मीनारायण मंदिरातील दानपेटी फोडून ५० ते ६० हजार रुपयांची रोकड व ६५ हजार किमतीच्या चांदीच्या पादुकांची चोरी केली आहे. विशेष बाब म्हणजे मंदिर असणाऱ्या याच पेठेत सोने-चांदीच्या व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात दुकाने आहेत, तर मंदिराच्या पश्चिमेकडील बाजूस एक नामांकित बँक व त्याचे एटीएम आहे. मंदिरात झालेल्या या चोरीमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, या पेठेत असणाऱ्या सोने-चांदीच्या व्यापाऱ्यांना यापूर्वी पोलिस प्रशासनाकडून सर्वांनी मिळून एक सुरक्षा रक्षक नेमावा, अशी सूचनादेखील करण्यात आली होती; मात्र त्याचे पालन न केल्याने चोरीच्या घटना घडताना दिसत आहेत. घटनास्थळी नारायणगाव पोलिसांनी भेट दिली असून जुन्नरचे उप विभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे तपास करीत आहे. पोलिस प्रशासनाने बाजारपेठेतील गस्त वाढवावी अशी मागणी येथील नागरिकांमधून केली जात आहे.

पोलीस प्रशासनाकडून रात्रीच्या वेळी गस्त घातली जात आहे; मात्र पोलिसांची गाडी निघून गेल्यानंतर चोरटे याचा फायदा घेऊन चोऱ्या करत आहेत. नारायणगाव बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी पोलिस प्रशासनाला मदत करणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करून सुरक्षा रक्षक नेमणे गरजेचे आहे. या घटनेतील चोरटे लवकरच पकडले जातील.

– पृथ्वीराज ताटे, सहायक पोलीस निरीक्षक, नारायणगाव

Back to top button