पुणे शहरात डेंग्युचे रुग्ण वाढले | पुढारी

पुणे शहरात डेंग्युचे रुग्ण वाढले

पुणे : पुढारी वृत्तसेवा: जुलैच्या पहिल्या आठ दिवसांत शहरात डेंग्यूचे 164 संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 24 रुग्णांमध्ये डेंग्यूचे निदान झाले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय पातळीवर स्वतंत्र पथक तयार केले आहे. डेंग्यूचा रुग्ण आढळलेल्या परिसरातील शंभरहून अधिक घरांची तपासणी करण्यात येत आहे. सध्या सततच्या पावसामुळे थंडी, ताप, सर्दीचे रुग्ण वाढत आहेत. तसेच डेंग्यूचे रुग्णही वाढत आहेत. फ्रिजच्या ट्रेमध्ये साठलेले पाणी, फ्लॉवरपॉट, पिंप, घराच्या छतावर व आजूबाजूला पडलेल्या खोलगट वस्तू, (उदा. रिकामे डबे, टायर, नारळाच्या करवंट्या) प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये साठलेले पाणी याचीही तपासणी करण्यात येत आहे.

प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये 15 ते 20 ब्रिडिंग स्पॉट सापडत आहेत. ब्रिडिंग स्पॉट नष्ट करून औषध फवारणी करण्यात येत आहे.‘डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पावसाळ्यात नागरिकांनी घरात, घरावर आणि परिसरात खोलगट वस्तूंमध्ये पाणी साठून डासांची पैदास होणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. डेंग्यूची कोणतीही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार करून घ्यावेत,’ असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

हलगर्जीपणा केल्याबद्दल आतापर्यंत 200 नागरिकांना नोटीस पाठविण्यात आली असून, 28 हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. नागरिकांनी स्वच्छ पाणी साठणार नाही व त्यामध्ये डासांची पैदास होणार नाही, याची स्वत:चे घर आणि परिसरात काळजी घ्यावी.

                        – डॉ. संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे मनपा

Back to top button