आश्चर्यम! वादग्रस्त ठेकेदार पात्र; कचरा वाहतूक गैरव्यवहारावरून चौकशी सुरू | पुढारी

आश्चर्यम! वादग्रस्त ठेकेदार पात्र; कचरा वाहतूक गैरव्यवहारावरून चौकशी सुरू

पांडुरंग सांडभोर

पुणे : शहरातील कचरा वाहतुकीच्या कोट्यवधी रुपयांच्या बिलांची चौकशी सुरू असतानाच संबंधित ठेकेदाराला पालिका प्रशासनाने तब्बल 131 कोटींहून अधिक रकमेच्या निविदांसाठी पात्र ठरविले आहे. धक्कादायक म्हणजे हे कामही कचरा वाहतुकीचेच आहे. त्यामुळे वादग्रस्त ठेकेदारावर पालिका एवढी मेहेरबान का आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शहरातील ‘डोअर टु डोअर’ कचरा गोळा करण्याचे काम 2016 मध्ये ‘स्वयंभू ट्रान्सपोर्ट’ या ठेकेदाराला मिळाले होते. हे काम कचर्‍याच्या वजनावर न देता वाहनांच्या फेर्‍यावर देण्यात आले होते. त्यानुसार, या कामासाठी 2016 ते 2020 या कालावधीत ठेकेदाराला देण्यात आलेल्या 70 कोटींच्या बिलांमध्ये मोठी अनियमितता झाली असल्याचे आढळून आले होते.

यासंबंधीचा गैरव्यवहार दै. पुढारीने वृत्तमालिकेच्या माध्यमातून उघडकीस आणला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्त विक्रम कुमार यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, दरम्यानच्या काळात कचरा वाहतुकीच्या ठेक्याची मुदत संपल्याने प्रशासनाने तब्बल साडेतीनशे कोटींच्या निविदा प्रक्रिया नव्याने राबविली आहे. या निविदा झोननिहाय आहेत. या निविदा प्रशासनाने नुकत्याच उघड केल्या असून, त्यात झोन 3 चे 64 कोटी 94 लाख आणि झोन 4 चे 65 कोटी 7 लाख अशा एकूण 131 कोटींच्या कामांसाठी स्वयंभू ट्रान्सपोर्ट ठेकेदाराला पात्र करण्यात आले असून, आता या ठेकेदाराला काम देण्याचा ठराव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी येणार आहे.

मात्र, एकीकडे कचरा वाहतुकीच्याच कामात कोट्यवधी रुपयांची अनियमितता केल्याप्रकरणी स्वयंभू ट्रान्सपोर्टची चौकशी सुरू असतानाही त्याला पुन्हा एवढ्या मोठ्या रकमेच्या कामासाठी पात्र कसे केले जाऊ शकते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे थेट प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

तीन महिने झाले, तरी चौकशी अहवाल प्रतीक्षेत
कचरा वाहतुकीच्या गैरव्यवहाराचे प्रकरण दै. पुढारीने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात उजेडात आणले होते. त्यानंतर आयुक्तांनी तत्काळ या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार, आठवडाभरात अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार चौकशी अहवाल सादर करणार होते. मात्र, आता तीन महिने लोटूनही ही चौकशी पूर्ण झालेली नाही. खेमणार यांनी केलेल्या चौकशीनंतर आता अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्याकडून चौकशी सुरू आहे. तक्रारदार आणि ठेकेदार दोन्हींच्या बाजू ऐकून लवकरच चौकशी अहवाल सादर केला जाईल, असे बिनवडे यांनी सांगितले.

‘स्वयंभू’वर नगरमध्ये गुन्हा दाखल
स्वयंभू ट्रान्सपोर्ट ठेकेदारावर अहमदनगर पालिकेत कचरा संकलनाच्या 1 कोटी 42 लाखांच्या घोटाळाप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल आहे. तर बारामती महापालिकेने संबंधित ठेकेदाराला थेट अपात्र ठरविले. पुण्यात मात्र एवढ्या मोठ्या रकमेची बिले असतानाही केवळ चौकशीच्या नावाखाली वेळकाढूपणा केला जात असल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Back to top button