पुणे

रसिकांनी लुटला नृत्य सादरीकरणाचा आनंद

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: गायन, वादन आणि नृत्याच्या त्रिवेणी सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली अन् कलाकारांच्या सादरीकरणाने रसिकांना वेगळ्या जगात नेले. निमित्त होते कलाश्री संगीत मंडळ आणि द औंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजित गायकवाड यांच्या वतीने आयोजित '9 व्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचे'.

महोत्सवाच्या दुसर्‍या दिवसाची सुरुवात अभिनेत्री चंद्रा रोमय्या, ज्येष्ठ संगीततज्ज्ञ सुधीर दाभाडकर, मंडळाचे अध्यक्ष पंडित सुधाकर चव्हाण, नामदेव शिंदे, कविता ढोरे, संदीप गुरव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर राधानंद संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे तबलावादन आणि कलाश्री संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गायन सादर केले. त्यापूर्वी गायिका यशस्वी सरपोतदार यांचे गायन झाले.

त्यांनी राग 'श्री'मध्ये विलंबित एकतालातील 'वारी जाऊ रे', द्रुत एकतालातील 'सांजपरी' आणि द्रुत तीन तालातील तराणा सादर केला. त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. उमेश पुरोहित आणि नीलेश रणदिवे यांनी साथ केली. त्यानंतर पं. अविराज तायडे यांचे गायन झाले. त्यांनी राग बागेश्रीमध्ये विलंबित एकतालातील 'सखी मन लागेना', छोटा ख्यालमध्ये 'जाती हू सनवा मोरे दर' या बंदिशी गायल्या.

त्यानंतर पं. भीमसेन जोशी यांचे 'राम रंगी रंगले' व संत तुकडोजी महाराज यांचा 'मन रे पढ हरी नाम ई गीता' हे स्वरचित भजन सादर केले. महोत्सवाच्या दुसर्‍या दिवसाची सांगता डॉ. पूर्वा शहा यांच्या कथक नृत्य सादरीकरणाने झाली. त्यांनी बिंदादिन महाराज लिखित राम भजन सादर केले. त्यानंतर तीन तालात पारंपरिक बंदिशी सादर केल्या. ठुमरी झुला सादर करून त्यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT