पुणे, पुढारी वृत्तसेवा: राज्यात 15 जून उलटला तरीही मान्सूनने हजेरी लावली नसल्यामुळे शेतकरीवर्ग चिंतातूर झाला असून, खरीप हंगामातील पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या आहेत. खरीप हंगामात सुमारे 150 लाख हेक्टरवरील पेरण्यांचे नियोजन कृषी विभागाने केलेले असले, तरी जून निम्मा मान्सूनविनाच गेल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.
याचा परिणाम प्रामुख्याने मूग आणि उडदाच्या पेरणीवर होऊन अन्य पिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. कृषी विभागाने ग्रामविकास आराखड्यातून खरिपातील पिकांचे गावनिहाय पेरण्यांचे नियोजन केले आहे. खरिपातील निश्चित केलेल्या दीडशे लाख हेक्टरवरील पेरण्यांसाठी 17 लाख 95 हजार 271 क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. तर 18 लाख 12 हजार 524 क्विंटल इतके गरजेपेक्षा अधिक बियाणेपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे.
खरिपातील प्रमुख पिकांमध्ये सर्वाधिक क्षेत्र सोयाबीन पिकाखाली असून, ते 46 लाख हेक्टर, तर कापूस पिकाखाली 42 लाख हेक्टर म्हणजे निम्म्याहून अधिक क्षेत्र या दोन पिकांखाली आहे. याशिवाय खरीप ज्वारी 3.25 लाख हेक्टर, बाजरी 6.40 लाख हेक्टर, भात 15.50 लाख हेक्टर, मका 9.50 लाख हेक्टर, तूर 13 लाख हेक्टर, मूग 4.85 लाख हेक्टर, उडीद 4 लाख हेक्टर, भुईमूग 2.10 लाख हेक्टर इतके प्रमुख पिकांचे क्षेत्र असल्याचे कृषी आयुक्तालयातून स्पष्ट करण्यात आले.
राज्यात गतवर्षीच्या खरीप हंगामात 43.34 लाख मेट्रिक टन खतांचा वापर झालेला होता. राज्याला चालूवर्षी 45.20 लाख मेट्रिक टन खतपुरवठ्यास केंद्राने मान्यता दिली आहे. त्यानुसार खतपुरवठा होण्यास सुरुवात झाली असून, युरिया आणि डीएपी या दोन खतांचा संरक्षित साठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ
शकले नाहीत.
गतवर्षीच्या खरिपात आजअखेर 4.30 लाख हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. ज्या चालू वर्षी पावसाअभावी घटून 2.25 लाख हेक्टरवर झाल्या आहेत. मान्सूनच्या पावसाची पिकांच्या पेरण्यांसाठी अत्यंत आवश्यकता आहे. कृषी विद्यापीठांच्या शिफारशीनुसार 15 जुलैपर्यंत पाऊस झाल्यास खरिपातील बहुतांशी पिकांच्या पेरण्या करता येतील.
– विकास पाटील, कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण)
हेही वाचा