

सातारा; पुढारी वृत्तसेवा : गेल्या वर्षी कोरोनामुळे पहिले सत्र ऑनलाईनच गेले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी नवीन शैक्षणिक वर्षात पुन्हा सेतू अभ्यासक्रम राबवला जाणार आहे. इयत्ता दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र या विषयांसाठी सेतू अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीतून सुमारे एक महिना मागील इयत्तेतील अभ्यासक्रमाची उजळणीच केली जाणार आहे.
कोरोना काळात शाळा बंद व शिक्षण सुरु होते. मागील दोन शैक्षणिक वर्षे ऑनलाईन शिक्षण देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत साशंकता व्यक्त झाली. मागील वर्षी पहिले सत्र ऑनलाईनच गेले. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता कमी झाली आहे. पुढचे पाठ मागचे सपाट अशी अवस्था सुधारण्यासाठी गेल्यावर्षी सेतू अभ्यासक्रम राबवण्यात आला. त्याची परिणामकारकता चांगली दिसून आली. त्यामुळे यावर्षी देखील पुन्हा इयत्ता दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकडून पहिले तीस दिवस सेतू अभ्यासक्रमातून मागील इयत्तेच्या अभ्यासक्रमाची उजळणी करुन घेतली जाणार आहे. कोरोना निर्बंध हटल्याने या वर्षी प्रथमच पूर्ण क्षेमतेने वर्ग भरत आहेत. या विद्यार्थ्यांची सुमारे एक महिना मागील इयत्तेतील अभ्यासक्रम उजळणी घेतली जाणार आहे. त्या दरम्यान विद्यार्थ्यांच्या पूर्व व उत्तर अशा दोन चाचण्याही घेतल्या जाणार आहेत.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्यावतीने शिक्षण विभागाला तशा सूचना देण्यात आल्या होत्या. काहीच दिवसांपूर्वी कार्यशाळेतून सेतू अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यानुसारच शैक्षणिक कामाकाज होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा सुरु झाली असली तरी सेतू अभ्यासक्रम उपक्रमामुळे एका महिन्यानंतरच नवीन शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. त्यामध्ये मागील इयत्तेत न समजलेल्या संज्ञा, व्याख्या, गणित व भूमितीतील सुत्रे, समीकरणे समजून घेता येतात. सेतूमुळे विद्यार्थ्यांचा मागील इयत्तेचा पाया भक्कम होणार असल्याने पुढील इयत्तेचे ज्ञानार्जन करणे सोपे होणार आहे.