सांगली शहरात पाणीटंचाई : १ कोटी लिटर उपसा कमी | पुढारी

सांगली शहरात पाणीटंचाई : १ कोटी लिटर उपसा कमी

सांगली; पुढारी वृत्तसेवा : कृष्णा नदीपात्रातील पाणी पातळी कमी झाली आहे. त्याचा परिणाम ‘इंटेकवेल’मधून होणार्‍या पाणी उपशावर झाला आहे. रोज सुमारे 1 कोटी लिटर पाणी उपसा कमी झाला आहे. त्यामुळे सांगली व कुपवाड शहर व उपनगरांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. कृष्णा नदीपात्रात कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे केली आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने सांगली बंधार्‍याच्या फळ्या काढल्या आहेत. त्यामुळे नदीपात्रातील पाणी वाहून गेले आहे. सध्या नदीतील पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. त्यामुळे नदी पात्रातील महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या ‘इंटेकवेल’ उघड्या पडल्या आहेत. पाणी पातळी कमी झाल्याने कृष्णेतून उपसा केला जाणार्‍या पाण्याचा डिस्चार्ज कमी झाला आहे.

प्रतितास सुमारे 36 ते 40 लाख लिटर पाण्याचा उपसा नदीतून केला जातो, पण नदीतील पाणी पातळी कमी झाल्यास प्रतितास सुमारे 30 ते 34 लाख लिटर इतका डिस्चार्ज होत आहे. दररोज सुमारे 1 कोटी लिटर पाणी उपसा कमी होत आहे. त्यामुळे पुरेशा दाबाने व पुरेसा पाणीपुरवठा होेत नाही. नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

कृष्णा नदीपात्रात कोयना धरणातून पाणी सोडावे. पुरेशी पाणी पातळी राहील, याची दक्षता घ्यावी, असे पत्र महानगरपालिकेने पाटबंधारे विभागाला पाठविले असल्याचे सांगण्यात आले.

खंडित वीजपुरवठ्याचाही फटका

महापालिकेच्या पाणीपुरवठ्याला खंडित वीजपुरवठ्याचाही मोठा फटका बसत आहे. वीज जोडणी एक्सप्रेस फिडरवर असतानाही वीज पुरवठा खंडित होत असल्याने महापालिकेने यापूर्वीही अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. मंगळवारी साडेतीन तास वीजपुरवठा खंडित होता. मंगळवारी रात्री अडीच तास वीज गूल झाली होती, याकडे महापालिकेने लक्ष वेधले आहे.

Back to top button