पुणे : पुढारी वृत्तसेवा मध्यरात्री बावधान बुद्रुक येथील बिग बास्केटच्या गोडाऊनला आग लागून गोदाम खाक झाले. आगीमधे धान्य, भाजीपाला, किराणा सामान जळून खाक झाले. बिग बास्केटच्या गोडाऊनला आग लागताच यामध्ये २० दुचाकी, सहा ते सात मोठया गाड्यांना आगीची झळ बसली. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाकडून पहाटे पावणेपाच वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होते.
अग्निशमन अधिकारी शिवाजी मेमाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन बुद्रुक येथे बिग बास्केट कंपनीचे गोदाम आहे. या गोदामाला आग लागली असल्याचा फोन अग्निशमन दलाला रात्री ११ वाजून ३३ मिनिटांनी मिळाला.
यानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या.
दीड किलोमीटर वरूनच आगीचे आणि धुराचे लोट दिसत होते.
घटनास्थळी पोहचल्यानंतर गोडाऊन बाबत माहिती घेतली असता, गोदाम 25 हजार स्केअर फूट मध्ये पत्र्याच्या शेडमध्ये होते.
बाहेर पार्कींगमध्ये चारचाकी आणि किरणामाल वाहतूक करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक दुचाकी उभ्या होत्या.
तसेच गोडाऊनच्या आतमध्ये तिजोरीत ही मोठ्या प्रमाणवर रक्कम असल्याचे समजते.
पार्किंग मधील डिझेल जनरेटर गाडी आणि डिझेल जवानांनी सुरवातीला बाजूला काढले.
नंतर दुचाकी चारचाकी बाहेर काढल्या. यावेळी सुमारे २० दुचाकी आणि काही चारचाकी वाहनांचे नुकसान झाले.
आगीचे आणि धुराचे लोट मोठ्या प्रमाणात असताना अग्निशमन जवान पाण्याचा मारा करत होते.
त्यातूनच त्यांना गोडाऊन मध्ये पैशाची तिजोरी अडकली असून, त्यामध्ये लाखो रुपयांची कॅश असल्याचे समजले.
तसेच तिजोरीची चावी देखील आतमध्ये असल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर जवान पाण्याचा मारा करत तिजोरीपर्यंत पोहचले. त्यांना आठ लाखांपैकी सहा लाखांची रोकड वाचवता आली.
सुमारे दोन लाखाची रोकड जळाली. आग विझविण्यासाठी पुणे महापालिका अग्निशमन दल, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए व एमआयडीसी येथील एकूण १० फायरगाड्या व पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले होते.
रात्री पावणेबारा वाजल्यापासून जवानांकडून आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरु होते. पहाटे पावणेपाच वाजता ही आग पूर्णपणे विझविण्यात आली.
तब्बल 70 जवान 5 अग्निशमन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले.
हेही वाचलं का ?