पुणे

पिपंरी : पालखी सोहळ्यासाठी देहूत दाखल झालेल्या वारकर्‍यांची भावना; इंद्रायणी काठ फुलला

अमृता चौगुले

देहूरोड : पुढारी वृत्तसेवा: ॥ आनंदाची डोही आनंद तरंग..॥ पंढरीच्या वारीसाठी दोन वर्षांपासून आसुसलेल्या वैष्णवांचा मेळा शनिवारी देहूनगरीत दाखल झाला अन् या अभंगातील भाव त्यांच्या मनी दाटून आले. संत श्री तुकाराम महाराज यांचा 337 वा पालखी सोहळा यावर्षी नव चैतन्याने फुलून गेला आहे. कोरोनामुळे गेले दोन वर्षे पालखी सोहळा झाला नव्हता.

त्यामुळे यंदा वारकर्‍यांमध्ये विठ्ठल भेटीची आस द्विगुणीत झाली आहे. लातूर, उस्मानाबाद, परांडा येथून भाविक आतापासूनच देहूत येण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर देहू देवस्थानने पालखी प्रस्थान सोहळा सोमवार (दि.20) रोजीच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या कार्यक्रमाची माहिती जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे पालखी सोहळाप्रमुख विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे यांनी दिली.

  • पहाटे 5 वाजता श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर व विठ्ठल रुक्माई महापूजा.
  • सकाळी 6 वाजता वैकुंठ स्थान येथे श्री संत तुकाराम महाराज महापूजा.
  • सकाळी 7 वाजता तपोनिधी नारायण महाराज समाधीची महापूजा संस्थानचे अध्यक्ष विश्वस्त वंशज व वारकरी यांच्या हस्ते होईल.
  • सकाळी 10 ते 12 श्री रामदास महाराज मोरे यांचे काल्याचे कीर्तन होईल.
  • सकाळी 9 ते 12 श्री संत तुकाराम महाराज पादुकापूजन (इनामदार वाडा)
  • दुपारी 2.30 मुख्य पालखी प्रस्थान सोहळ्याची प्रमुख सन्माननीय यांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात.
  • सायंकाळी 5 वाजता पालखीची देऊळवाड्यात प्रदक्षिणा.
  • सायंकाळी 6.30 वाजता पालखी सोहळ्याचा इनामदार वाड्यात मुक्काम.

या वर्षीची वारी पर्यावरणपूरक व प्लास्टिक मुक्तीची असेल. कोरोनाचा कहर आपण सर्वांनी अनुभवला आहे. त्यातून सर्वांनी शिकवण घेण्याची गरज आहे. आपल्या पृथ्वी मातेला आपण 'प्लास्टिक मुक्त' करूयात.

                           – माणिक महाराज मोरे, पालखी सोहळाप्रमुख

हेही वाचा

SCROLL FOR NEXT