

आष्टा , पुढारी वृत्तसेवा : स्व. विलासराव शिंदे यांचे नेतृत्त्व वाखाणण्याजोगे होते. त्यांच्यासारखा नेता आता शोधूनही सापडणार नाही. त्यांनी शेवटपर्यंत पक्षसंघटना व गोरगरिबांसाठी काम केले. त्यांच्यामुळेच आष्ट्याची प्रगती झाली, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.
स्व. विलासराव शिंदे यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, उपाध्यक्षा जयश्री पाटील, माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील, माजी नगराध्यक्ष झुंझारराव शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे, माजी उपनगराध्यक्ष विशाल शिंदे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य झुंझारराव पाटील उपस्थित होते.
ना. पाटील पुढे म्हणाले, त्यांनी घालून दिलेल्या विचाराने यापुढील काळात वाटचाल करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. गेल्या 25 वर्षात त्यांच्यासोबत एकत्रित काम केल्यामुळे आष्टा शहराची मोठी प्रगती झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आष्टा शहरात स्व. विलासराव शिंदे यांच्यामुळेच मोठे काम झाले आहे. नगरपालिकेच्या निवडणुका कधीही लागू शकतील. यापुढील काळात सर्वांनी एकत्रित लढून आष्टा व इस्लामपूर नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आणायची आहे. या दोन्ही शहरांना विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.