सोलापूर : सुरुवातीलाच शिक्षकांची दांडी | पुढारी

सोलापूर : सुरुवातीलाच शिक्षकांची दांडी

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी शनिवारी सकाळी साडेसातपासून विविध शाळांची तपासणी केली. यात मोहोळ तालुक्यातील पेनूर, पंढरपूर तालुक्यातील तुंगत शाळेत शिक्षक गैरहजर असल्याचे दिसून आले. या शिक्षकांची त्यांनी गैरहजेरी मांडली असून त्यांच्यावर विनावेतनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने राबविलेल्या विशेष उपक्रमात गेल्यावर्षी लोकसहभागातून शाळा स्वच्छ व सुंदर करण्यात आल्या. यंदाच्या वर्षी शाळेत गुणवत्ता वाढावी, शाळेच्या कामकाजात शिस्त यावा यासाठी जि.प. प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवरच लोहार यांनी शाळांची अचानक तपासणी सुरू केली आहे.

मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील शाळेत फक्त मुख्याध्यापकच वेळेत हजर होते. उर्वरित 17 शिक्षक गैरहजर दिसून आले. याठिकाणी दोन शाळा असून एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी उशिरा शाळेत आल्यानंतर शिक्षणाधिकार्‍यांसमोरच हजेरीपत्रकावर स्वाक्षरी करण्याचा प्रयत्न केला. याबाबत शिक्षणाधिकार्‍यांनी त्यांना जाब विचारला असता आरटीई नियमाने शाळा आठ वाजता भरते, असे उलट उत्तर संबंधित मुख्याध्यापकाने दिले. तसा नियम दाखवा, असे शिक्षणाधिकार्‍यांनी सांगितल्यानंतर मात्र त्या मुख्याध्यापकाने चूक कबुल केली.
पंढरपूर तालुक्यातील वाटंबरे येथील जि. प. शाळेतच दोन शिक्षक गैरहजर असल्याचे दिसून आले. यातील एक शिक्षक निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे स्पष्ट झाले.

Back to top button