पुणे; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी चिंचवड महापालिकेत लाचखोरीच्या प्रकरणात थेट स्थायी समितीच्या अध्यक्षांचे नाव समोर आले होते. आता जमिनीच्या व्यवहारात फसवणुक केल्याप्रकरणात पिंपरी चिंचवडच्याच आणखी एका नगरसेवकावर अटकेची टांगती तलवार आली आहे. पोलिसांनी देखील तपास करण्यासाठी संबंधित नगरसेवकाला अटक करण्याची इच्छा न्यायालयासमोर व्यक्त केली आहे. परंतु, तो नगरसेवक कोण हे तपासानंतरच स्पष्ट होईल असे पोलिसांचे म्हणणे आहे.
शहरासह जिल्ह्यात जमिनीच्या व्यवहारात फसवणुकीचे प्रकार समोर येत असताना एका प्रकरणात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगरसेवकाच्या कारनाम्यामुळे आरोपींनी मुळ मालकाच्या परस्पर जमिनीची विक्री केल्याचे स्पष्ट झाले आहे. नगरसेवकाने दिलेल्या ओळखीच्या पुराव्यावरून आरोपींनी जमिनीच्या मूळ मालकाच्या नावाने बनावट आधारकार्ड तयार केले.
त्याद्वारे, मुळशी तालुक्यातील गोडांबेवाडी येथील जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन परस्पर नावावर करून घेत तब्बल 2 कोटी 50 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे.
त्यांपैकी, रिक्षाचालक दिपक वसंत चितळकर (वय 43) व पेंटर विरेंद्र सिह ठाकुर (वय 55, दोघेही रा. म्हस्के वस्ती, रावेत) यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी त्यांच्या पोलिस कोठडीत 8 सप्टेंबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
प्रतिम सुरेंद्र पाषाणकर (वय 44) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मे ते जून 2021 दरम्यान हिंजवडी फेज एक परिसरात हा प्रकार घडला. आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या वडीलांच्या नावावर मुळशी तालुक्यातील गोडांबेवाडी येथे असलेल्या जमिनीचे परस्पर बनावट व्यक्ती उभ्या करून, बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड बनवून तसेच खोट्या सह्या करून साठेखत आणि कुलमुखत्यारपत्र तयार करून घेतले. तसेच खरेदीखत तयार करून परस्पर ही जमीन उत्तुंग पाटील याच्या नावावर करून घेतली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना शुक्रवारी (दि. 3) न्यायालयात हजर करण्यात आले होते. युक्तिवादादरम्यान, सहाय्यक सरकारी वकील विजयसिंह जाधव म्हणाले, आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. त्यांनी फिर्यादी यांच्या वडिलांच्या नावाचे बनावट शिधापत्रिका, आधारकार्ड तयार केली आहेत.
तसेच, चितळकर याने त्याचे बनावट आधारकार्ड वसई येथून बनविल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याने फिर्यादी यांच्या नावाने आधारकार्ड बनवताना नाव बदलण्यासाठी मुख्य अटक आरोपी उत्तुंग पाटील याने महाराष्ट्र शासनाचे गॅझेट प्रसिध्द केले होते का याचा तपास करायचा असल्याने आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी अॅड. जाधव यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.