पुणे

पालखी सोहळ्यात संविधानाचा जागर

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा: कोविडच्या निर्बंधांमुळे मागील दोन वर्षांपासून खंड पडलेली ज्ञानोबा-तुकोबांची पालखी या वर्षी मोठ्या उत्साहात देहू-आळंदीवरून पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अभिनव संकल्पनेतून या वर्षी पालखी सोहळ्यात ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषाबरोबरच संविधानाचा देखील जागर करण्यात येणार आहे. पालखी प्रस्थानाच्या वेळी आळंदी येथून पालखीसोबतच संविधान दिंडी आयोजित करण्यात आली आहे.

21 जून रोजी आळंदी येथून निघणारी ही संविधान दिंडी पालखी मार्गावर सर्वत्र संवैधानिक मूल्यांचा गजर भजन-कीर्तन, अभंग आदींच्या माध्यमातून करीत 10 जुलै रोजी पंढरपूर येथे पोहचणार आहे. 21 जूनला आळंदी येथील चर्‍होली फाट्यावर दुपारी 3 वाजता या दिंडीचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. या दिवशी सायंकाळी संविधान जलसा व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 22 जून रोजी संविधान दिंडी विठोबा मंदिर, भवानी पेठ, पुणे येथे मुक्कामास येईल.

यादरम्यान राज्यातील नामवंत विचारवंत, सांस्कृतिक कलावंत, भजनी मंडळ आदींच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम घेतले जातील. 23 जून रोजी पालखी मुक्कामस्थळाजवळ नाना पेठ येथे संविधान जलसा हा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमास मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह ज्येष्ठ सिनेकलाकार तथा विचारवंत नसिरुद्दीन शाह, नीलेश नवलखा, शबाना आझमी, नागराज मंजुळे, रत्नाकर पाठक, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे,

समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 24 जूनपासून 10 जुलैपर्यंत पालखी सोहळ्यात संविधान दिंडी संमिलित होऊन, त्यामधून ठिकठिकाणी संविधान जलसा, संविधानावर व संविधानातील मूल्यांवर आधारित प्रवचने-कीर्तने, सप्तखंजिरी कीर्तन आदी उपक्रम सुरू राहतील. 24 जून ते 10 जुलै पालखी सोहळा व संविधान दिंडी पालखीच्या ठरलेल्या मुक्काम मार्गावर मार्गक्रमण करीत जाईल.

अशी असेल संविधान दिंडी
आळंदीत माउलींच्या जयघोषाबरोबर निघणार संविधान दिंडी बार्टीमार्फत मंगळवारी दिंडीचे उद्घाटन गुरुवारी पुण्यात पालखी मुक्कामस्थळी धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत संविधान जलसा नसिरुद्दीन शाह, शबाना आझमी, नागराज मंजुळे यांच्यासह मान्यवर राहणार उपस्थित

संवैधानिक मूलगजर
महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून दरवर्षी लाखो भाविक वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन पालखी सोहळ्यात सहभागी होतात. देशाचे संविधान देखील आपल्या संतांनी दिलेल्या समता, बंधुभाव व सामाजिक न्याय या मूलतत्त्वांवर आधारित आहे. आजच्या पिढीला आपल्या अधिकार व कर्तव्यांची जाणीव व्हावी, देशाचे नागरिक हे जबाबदार असावेत, या उद्देशाने लाखो भाविकांच्या 'ज्ञानोबा, माउली, तुकाराम' या जयघोषाच्या निनादात निघणार्‍या पालखी सोहळ्यात या वर्षी संविधान दिंडी आयोजित करण्यात येत आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT