कोकण रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी विद्युतीकरण प्रकल्पाचे साक्षीदार होण्याचे भाग्य : मोदी | पुढारी

कोकण रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी विद्युतीकरण प्रकल्पाचे साक्षीदार होण्याचे भाग्य : मोदी

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा कोकण रेल्वेच्या 740 किलोमीटर लांबीच्या संपूर्ण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून त्याचे आज राष्ट्रार्पण होत असल्याने ही देशासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे गौरवोद‍्गार काढत या प्रकल्पाचे साक्षीदार होण्याचे आपल्याला भाग्य लाभल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या प्रकल्पाच्या राष्ट्रार्पण सोहळ्याप्रसंगी बोलताना सांगितले.

कोकण रेल्वेच्या मार्गाचे 100 टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. विद्युतीकरण झालेल्या या मार्गाचा राष्ट्रार्पण सोहळा सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कर्नाटकमधील मंगळुरूमधून व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे या कार्यक्रमाला झेंडा दाखवून पार पडला. यासाठी कोकण रेल्वेच्या मार्गावर रत्नागिरी, मडगाव आणि उडुपी या तीन ठिकाणी रेल्वे स्टेशनवर सोमवारी विशेष कार्यक्रम संपन्‍न झाला.

यानिमित्त रत्नागिरी रेल्वे स्थानकावर या सोहळ्याला अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे, मिरजोळे सरपंच गजानन गुरव, कोकण रेल्वे पोलिस निरीक्षक अजित मदाळे आदी उपस्थित होते. याशिवाय रेल्वे अधिकारी आणि कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम मंगळूरुमधून व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे पार पडल्याने रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे मोठ्या स्क्रिनवर याचे लाईव्ह प्रक्षेपण दाखविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळूरु येथून रिमोटव्दारे ग्रीन सिग्‍नल दिल्यानंतर प्रात्यक्षिक म्हणून रत्नागिरी येथून एक विद्युतीकरणावर चालणारी रेल्वे मालगाडी मडगावच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली. लोकार्पण सोहळ्यामुळे रेल्वे स्थानकावर आलेली ही मालगाडी रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आली होती.

हेही वाचा

Back to top button