सातार्‍यात 100 खाटांचे ईएसआय हॉस्पिटल | पुढारी

सातार्‍यात 100 खाटांचे ईएसआय हॉस्पिटल

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या अखत्यारितील ईएसआय कार्पोरेशन मार्फत सातार्‍यामध्ये नवीन 100 खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. ईएसआय कार्पोरेशनतर्फे याबाबतची अधिकृत घोषणा केंद्रीय कामगार मंत्री ना. भुपेंद्रसिंह यादव यांनी केली आहे. सातार्‍यात सैनिक हॉस्पिटल आणि ईएसआय हॉस्पिटल उभारणीबाबत आमचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्यापैकी 100 खाटांचे ईएसआयसीचे हॉस्पिटलकरता मंजुरी मिळाल्याने याचा लाभ जिल्ह्यातील ईएसआय योजना लागू असणार्‍या लाखो कामगारांना होणार असल्याची माहिती खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी दिली.

सक्षम सार्वजनिक आरोग्य सुविधा ही आज काळाची गरज बनली आहे, असे नमूद करून खा. उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, कोरोना काळात राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवकांनी अतिशय चांगले कार्य केले आहे. सार्वजनिक आरोग्य यंत्रणांवर ताण येवू नये, म्हणून अधिकाधिक सार्वजनिक सुविधा विविध माध्यमातून सुरू करण्यासाठी आम्ही सैनिक हॉस्पिटल आणि ईएसआय हॉस्पिटल स्वतंत्रपणे सुरू करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्तावित केलेले आहे. केंद्र शासनाच्या कामगार खात्याच्या अखत्यारित येणार्‍या ईएसआय;कार्पोरेशने महाराष्ट्रात सहा ठिकाणी 100 खाटांचे रुग्णालय सुरू करण्याबाबत धोरण आखले असून, त्या धोरणानुसार महाराष्ट्रात पालघर, सातारा, पेण, जळगाव, चाकण आणि पनवेल या ठिकाणी ईएसआय हॉस्पिटलची उभारणी करण्याचे निश्चित केले असल्याचे खा. उदयनराजे यांनी म्हटले आहे.

ईएसआय हॉस्पिटलच्या उभारणीकरता काही जागा आम्ही सुचवलेल्या आहेत. त्यापैकी एका जागेची निश्चिती करण्यात येणार आहे. जागा निश्चिती झाल्यावर या ठिकाणी ईएसआय कार्पोरेशनचे 100 खाटांच्या रुग्णालयाची उभारणी करण्यात येईल.

सातारा जिल्ह्यात कामगारांची संख्या मोठी आहे. तसेच ईएसआय योजना लागू असलेले कामगार सुध्दा काही लाखात आहेत. त्या सर्व कामगारांना या रुग्णालयाचा मोठा आधार लाभणार आहे. लवकरच मिल्ट्री हॉस्पिटलदेखील सुरू होण्यासाठी आमचा अखंड पाठपुरावा सुरू आहे, असेही खा. उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.

 

Back to top button