पुणे; पुढरी वृत्तसेवा : अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत कथीत रॉ एजंट, फेसबुक फ्रेन्डने महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार शहरात समोर आला आहे.
एवढेच नाही तर त्याने रॉ चे बनावट आयकार्ड दाखवून पिडीत महिला व तिच्या घरच्यांची छळवून देखील केली. त्याच्याकडून वारंवार होणार्या त्रासाला कंटाळून संबंधीत महिलेने एक्सपायर झालेल्या गोळ्या खावून दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला.
याप्रकरणी, एका 31 वर्षीय महिलेने उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नितेश उर्फ निकेश राठोड नावाच्या व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना 2018 ते 14 जूलै या कालावधीत फिर्यादी महिलेच्या राहत्या घरी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राठोड याची सुरुवातीला फेसबुकच्या माध्यमातून फिर्यादी महिलेच्या बहिणीसोबत ओळख झाली होती. त्यातून दोघांचा परिचय झाला.
आपण अनाथ असल्याचे सांगून राठोड याने फिर्यादी महिलेला आपल्या भावनिक जाळ्यात खेचले. त्यानंतर जवळीक निर्माण केली.
फिर्यादी महिलेला तिच्या घरच्यांना मारून टाकेल अशी धमकी देत नग्न व्हिडिओ तयार करून ते त्याला पाठविण्यास भाग पाडले.
तसेच व्हिडिओ कॉलवर देखील तो फिर्यादी महिलेसोबत अश्लिल वर्तन करत असे. राठोडकडून सतत होणार्या मानसिक त्रासाला कंटाळून फिर्यादी महिलेने दोनवेळ घरातील एक्सपायर झालेल्या गोळ्या खावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
राठोड याने फिर्यादीला ब्लॅकमेल करत नग्न व्हिडीओ व फोटो सोशल मिडीयावर आणि पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी देत अनेकवेळा बलात्कार केला.
त्यानंतर राठोड याने हे व्हिडीओ आणि फोटो फिर्यादीची बहिण व भावाला पाठवले. तसेच फिर्यादीच्या मोबाईलमध्ये एअरड्रॉईड नावाचे अॅप डाऊनलोड करून त्यांच्या परवानगीशिवाय मोबाईलचा अॅक्सेस आपल्या ताब्यात घेतला.
राठोड हा फिर्यादी व त्यांच्या घरच्यांची रॉ चे बनावट आयकार्ड दाखवून कॉल व मेसेज करून छळवणूक करत होता. त्यानंतर फिर्यादीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास उत्तमनगर पोलिस करीत आहेत.