पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या 41 शाळांमधील 50 विद्यार्थी सोमवारी (दि. 6) इस्रोभेटीसाठी रवाना झाले आहेत. या विद्यार्थ्यांना विविध विज्ञान केंद्रांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. देशातील पहिले रॉकेट स्टेशन असलेल्या थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉंचिंग स्टेशनवरून होणारे रॉकेट प्रक्षेपण ते थेट पाहू शकतील.(Latest Pune News)
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेतर्फे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत तीन दिवसांचा शैक्षणिक दौरा आयोजित केला आहे. या दौऱ्यासाठी ‘इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी ॲंड ॲस्ट्रोफिजिक्स’ (आयुका) तर्फे आयोजित तीन टप्प्यांच्या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या परीक्षेत 13 हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी 50 विद्यार्थी या अनोख्या संधीसाठी निवडले गेले आहेत.
या दौऱ्यात विद्यार्थी भारतातील नामांकित वैज्ञानिक केंद्रांना भेट देतील. त्यामध्ये विक्रम साराभाई अंतराळ केंद्र, इस्रो स्पेस म्युझियम, केरळ सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्युझियम आणि प्लॅनेटेरियम (जिथे विद्यार्थी विविध वैज्ञानिक प्रयोग आणि अंतराळविषयक सादरीकरणांचा अनुभव घेतील), थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉंचिंग स्टेशन जिथे 8 ऑक्टोबर रोजी ठक200 या साउंडिंग रॉकेटचे प्रक्षेपण होणार आहे आणि ते विद्यार्थी थेट पाहतील, तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी (देशातील अंतराळ संशोधनाचे प्रमुख शैक्षणिक केंद्र) यांचा समावेश आहे.
साउंडिंग रॉकेट्सचा वापर पृथ्वीच्या वायुमंडळाचा खोलवर अभ्यास करण्यासाठी होतो, ज्यामुळे हवामानशास्त्र, पर्यावरण संशोधन आणि अंतराळ विज्ञान यांना प्रगती मिळते.
इस्रोसारख्या राष्ट्रीय दर्जाच्या विज्ञान संस्थांना भेट देण्याचा अनुभव विद्यार्थ्यांच्या विचारविश्वाला दिशा देईल. अशा भेटींमुळे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण होते, त्यांच्या कल्पनाशक्तीचा विस्तार होतो आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही भारताच्या वैज्ञानिक प्रवासात योगदान देण्याची प्रेरणा मिळते.गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे