Yerwada Jail Art Exhibition Pudhari
पुणे

Yerwada Jail Art Exhibition: येरवडा कारागृहातून सुटलेल्या 'या' मित्रांनी कलेच्या माध्यमातून रचली नवी कहाणी

एक चित्रकार, तर दुसरे लेखक; शिक्षा भोगून आल्यानंतर दोघांच्या कलाकृतींचे पुणे शहरात प्रदर्शन; दुसऱ्या संधीचे केले सोने!

पुढारी वृत्तसेवा

पुणे : येरवडा कारागृहात असतानाच ते कलेकडे वळले. एक चित्रकार तर दुसरे लेखक... कारागृहात असताना एकाने चित्रकलेची वाट शोधली तर एकाने लेखनाची...मग, काय? कलेची आवड असणाऱ्या दोघांची मैत्री कारागृहात जमली अन्‌‍ त्यांनी शिक्षा भोगून कारागृहातून सुटल्यानंतर दोघांनीही आपल्यातील कलाकारीला नवी वाट दिली, तीही कलाकृती प्रदर्शनातून...

ही कहाणी आहे अमित (नाव बदलले आहे) आणि नितीन (नाव बदलले आहे) या दोघा मित्रांची. दोघांच्याही कलाकृतींचे ‌‘झाले मोकळे आकाश‌’ हे अनोखे प्रदर्शन हिंदूहृदयसमाट बाळासाहेब ठाकरे कलादालनात भरविण्यात आले आहे. अमित यांनी काढलेल्या चित्रांचा आणि नितीन यांनी लिहिलेल्या लेखांचा समावेश असलेल्या प्रदर्शनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आयुष्यात मिळालेल्या दुसऱ्या संधीचे दोघांनी सोने केले आहे.

भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मंडळ पुणेच्या वतीने प्रेरणापथ प्रकल्पाअंतर्गत कारागृहातून शिक्षा भोगून सुटका झालेल्या दोन मित्रांंच्या कलाकृतीचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी (दि.30) राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते झाले. अपर पोलिस महासंचालक आणि महानिरिक्षक (कारागृह आणि सुधार सेवा) सुहास वारके, विशेष पोलिस महानिरिक्षक सुधीर हीरेमठ,

अपर पोलिस आयुक्त संजय पाटील, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. हेमंत झंजाड, विशेष कारागृह महानिरिक्षक योगेश देसाई, पोलिस अधिकारी (निवृत्त) चंद्रशेखर दैठणकर, बीव्हीजी गृपचे अध्यक्ष हनुमंत गायकवाड आदी उपस्थित होते. भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई आणि आदर्श मित्रमंडळाचे उदय जगताप यांनी उपक्रमाचे आयोजन केले आहे.

कारागृहात शिक्षा भोगत असताना अमित यांची चित्रांच्या जगाशी नाते जुळले, त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर चित्र काढण्यास सुरुवात केली. कारागृहातून अमित यांची 2024 मध्ये सुटका झाली. मग त्यांना कलेचा अवकाशच मिळाला. तर नितीन यांची कहाणीही काहीशी अशीच आहे. त्यांचेही लिखाणाशी नाते जुळले. त्यांची अमित यांच्याशी मैत्री झाली. अमित यांनी काढलेल्या चित्रांचा अर्थ नितीन यांनी स्वत:च्या लिखाणातून लिहायला सुरूवात केली.

एकाचे चित्र आणि दुसऱ्याचे शब्द असे समीकरण जुळून आले आणि त्यातून आकाराला आले मोकळे आकाश हे प्रदर्शन. याप्रदर्शनात नारी तूच नारायणी, नजरेचा खेळ, दुष्काळ, जीवन चक्र, याला जबाबदार कोण?, जीवनाचे महत्त्व आदी विषयांवरील चित्रे पाहता येतील. तर प्रत्येक चित्राचा अर्थ सांगणारे लेखही प्रदर्शनात असून, हे प्रदर्शन सोमवारपर्यंत (दि.1) सकाळी 9 ते रात्री 9 यावेळेत पाहायला मिळणार आहे.

पूर्वायुष्य विसरता येणार नाही. पण, आयुष्याने दिलेल्या दुसऱ्या संधीचे सोने तर केलेच पाहिजे. त्यामुळेच मी ठरवले की, कलेच्या वाटेवरच चालायचे. माझ्या या कलेला रसिकांची दाद मिळत असल्याचा आनंद आहे.
अमित, चित्रकार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT