

बारामती : बारामती नगरपरिषद निवडणूक सुमारे तीन आठवडे पुढे ढकलल्याने उमेदवारांची चिंता मोठी वाढली आहे. आता आणखी 18 दिवस कार्यकर्ते सांभाळावे लागणार असल्याने उमेदवारांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. याशिवाय स्थानिक राजकारणात मोठ्या उलथापालथी होण्याची चिन्हे आहेत. निवडणूक पुढे गेल्याचा फायदा कोणाला आणि तोटा कोणाला, यावर आता शहरात चर्चा झडू लागल्या आहेत.
यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडणार होते. आता ते 20 डिसेंबरला होईल. पालिका निवडणूकीसाठी दि. 17 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस (अ.प.) पक्षाने याच दिवशी आपल्या नगराध्यक्षपदासह अन्य 41 जागी आपले नगरसेवकपदाचे उमेदवार जाहीर केले होते. दि. 21 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत राष्ट्रवादीच्या आठ जागा बिनविरोध झाल्या होत्या.
अन्य जागांसाठी निवडणूक लागली होती. त्यात काही प्रभागातील जागांबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली होती. न्यायालयाने त्यामध्ये तीन जागांसंबंधी निकाल दिले. परिणामी प्रभाग 13 ब आणि 17 अ या दोन जागांसाठी नव्याने अर्ज दाखल झाले. परंतु, 15 अ साठी अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 13 ब व 17 अ या दोन जागा वगळता अन्य ठिकाणचे मतदान पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार 2 डिसेंबर रोजी होणार असल्याचे जाहीर केले होते. आता निवडणूक आयोगाने नैसर्गिक न्याय तत्त्वाचा अवलंब व्हावा यासाठी मतदानाची तारीख बदलली आहे.
बारामतीत 21 नोव्हेंबरपासूनच दोन्ही राष्ट्रवादीसह भाजप, शिवसेना, बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष व अन्य अपक्ष आपापला प्रचार करत आहेत. कार्यकर्त्यांना, मतदारांना 10 दिवस सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यात आता आणखी 18 दिवसांची भर पडली आहे. त्यामुळे उमेदवारांसाठी ही निवडणूक कमालीची खर्चीक बनली आहे. तिढा असलेल्या नगराध्यक्ष व अन्य सात जागांच्या उमेदवारांची खर्च मर्यादा वाढणार आहे, अन्य उमेदवारांची खर्च मर्यादा तीच राहणार आहे. त्यामुळे त्यांना आता छुप्या खर्चाने ही कसर भरून काढावी लागणार आहे.
दि. 21 नोव्हेंबरपासून सुरू झालेली आणि थकवा निर्माण करणारी प्रचार मोहीम आता आणखी वाढणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये दमछाक होण्याची शक्यता आहे. शिवाय मतदारांमध्ये ’ओव्हर कॅम्पेनिंग’मुळे उद्भवू शकणारा कंटाळा देखील काही उमेदवारांना अडचणीत आणू शकतो.
निवडणूक पुढे गेल्यामुळे आर्थिक गणितातही बदल होणार हे निश्चित. अनेक उमेदवारांनी प्रचारासाठी केलेली तरतूद आता वाढवावी लागणार आहे. त्यामुळे मध्यम व लहान श्रेणीतील उमेदवारांवर अतिरिक्त ताण पडू शकतो. विविध पक्षीय पातळीवर निधी, सभा, पदयात्रा, बूथ रचना यासाठी नव्याने नियोजन करावे लागणार आहे.
काही प्रभागात चुरशीच्या लढती दिसत होत्या. आता तीन आठवड्यांचा वेळ हाती असल्याने तेथील नाराजी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून दूर केली जावू शकते. अन्य ठिकाणी सामावून घेवू, असा शब्द दिला जाऊ शकतो. दुरावलेल्यांना जवळ करण्यासाठी अनेक क्लृप्त्या वापरल्या जाऊ शकतात. परिणामी सर्व प्रकारची ताकद असलेल्या बाहुबलींसाठी ही निवडणूक आता सोपी तर अन्य उमेदवारांसाठी ती अधिकच कठीण होऊन बसली आहे. एकूणच, बारामती नगरपरिषद निवडणूक पुढे गेल्याने राजकीय रंगमंचावर अनपेक्षित उलथापालथ होणार हे निश्चित. याचा कोणाला फायदा आणि कोणाला तोटा हे निवडणुकीच्या अंतिम निकालातच स्पष्ट होईल. परंतु, ज्याचे बळ मोठे त्याला फायदा हे गणित दिसेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.