प्रभाग क्रमांक : 6 येरवडा-गांधीनगर
महाविकास आघाडीतील घट पक्षांना साथ देणाऱ्या येरवडा भागात भाजपला अद्याप तरी कमळ फुलविता आलेली नाही. आत्ताही महाविकास आघाडीसाठी हा प्रभाग अनुकूल मानला जात असून, आघाडीतील जागा वाटप हाच कळीचा मुद्दा ठरणार आहे. काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँगेस (शरद पवार गट) यांच्यात जागा वाटपावरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
याप्रभागात ‘अ’ गट अनुसूचित जाती प्रवर्ग, ‘ब’ गट नागरिकांचा मागास (महिला) प्रवर्ग, ‘क’ गट सर्वसाधारण (महिला) प्रवर्ग आणि ‘ड’ गट सर्वसाधारण प्रवर्ग, असे आरक्षण पडले आहे. या प्रभागात विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजपला कसरत करावी लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
गत महापालिका निवडणुकीत (2017) येरवड्यातील संपूर्ण परिसर हा प्रभाग 6 मध्ये होता. मात्र, आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी, अहिल्या सोसायटी, हरीगंगा हा भाग प्रभाग 2 ला (फुलेनगर-नागपूर चाळ) जोडण्यात आला आहे. तसेच लक्ष्मीनगरचा काही भाग, जय जवाननगरचा भागही वगळण्यात आल्याने दोन माजी नगरसेवकांचे नुकसान झाले आहे. वगळण्यात आलेल्या भागातील 18 हजार मतदारांचा समावेश प्रभाग क्र. 13 मध्ये (पुणे स्टेशन-जय जवाननगर) करण्यात आला आहे. यामुळे प्रभाग 13 मधून यंदा श्वेता चव्हाण, अश्विनी संजय भोसले निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. तसेच, नव्याने समाविष्ट करण्यात आलेले गांधीनगर, जय प्रकाशनगर हा भाग प्रभाग 3 मधून कमी करून प्रभाग 6 ला जोडण्यात आला आहे. याचा फायदा या भागात जनसंपर्क दांडगा असलेल्या दोन माजी नगरसेवकांना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रभाग 6 मध्ये मागासवर्गीय प्रवर्गातून (एससी) काँग्रेसचे अविनाश साळवी हे उमेदवारासाठी मुख्य दावेदार मानले जात आहेत. याशिवाय काँग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष रमेश सकट, माजी नगरसेवक संतोष आरडे हेदेखील इच्छुक आहेत. तसेच, संतोष आरडे हे मुलगी श्वेता आरडे हिच्या उमेदवारीसाठी देखील आग्रही असल्याचे सांगण्यात येत आहे.
सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातून शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक संजय भोसले हे इच्छुक आहेत, तर ठाकरे गटातून शिवसेनेत आलेले आनंद गोयल, उपशहरप्रमुख सुनील जाधव इच्छुक आहेत. भाजपचे संतोष राजगुरू, अनवर पठाण, किशोर वाघमारे हेदेखील इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून माजी नगरसेवक हनिफ शेख, शैलेश राजगुरू, किशोर विटकर, तुषार महाजन, निरंजन कांबळे आणि काँग्रेसकडून विशाल मलके, राकेश चौरे, डॅनियल लांडगे हे इच्छुक आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून रूपेश गायकवाड, अजित गंगावणे, शैलेश भोसले हे इच्छुक आहेत. मनसेचे मनोज ठोकळ, लक्ष्मण काते, कीर्ती माचरेकर यांचा इच्छुकांमध्ये समवेश आहे.
महिला खुल्या गटातून काँग्रेसकडून अश्विनी डॅनियल लांडगे यांचे नाव चर्चेत आहे. तसेच, माजी नगरसेविका ज्योती विल्सन चंदेलवाल, श्वेता आरडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून अक्षता राजगुरू, सायरा शेख, शिवसेना शिंदे गटातून स्नेहल सुनील जाधव, मनसेकडून रूपाली मनोज ठोकळ हे इच्छुक आहेत.
या प्रभागात 90 टक्क्यांपेक्षा जास्त भाग झोपडपट्ट्यांचा असून, एकूण मतदार संख्या 77 हजार 606 इतकी आहे. यात अनुसूचित जाती प्रवर्गाची (एससी) संख्या 20 हजार 958, तर अनुसूचित जमाती प्रवर्गाची (एसटी) संख्या 849 इतकी आहे. या निवडणुकीत महायुती, महाआघाडी होणार का? शिवसेना ठाकरे गट व मनसे एकत्र निवडणूक लढविणार का? याबाबत संदिग्धता असली, तरी सर्व पक्षांतील इच्छुकांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली आहे.
विधानसभा निवडणुकीत येरवडा भागातून तुतारीला मिळालेल्या मताधिक्याने आमदार बापूसाहेब पठारे यांचा विजय सुकर झाला होता. आता महापालिका निवडणुकीत या प्रभागात आ. पठारे, माजी आमदार सुनील टिंगरे आणि जगदीश मुळीक यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.