Yerwada Problems PMC Election Pudhari
पुणे

Yerwada Problems PMC Election: येरवडा-गांधीनगरात अतिक्रमण-कोंडीचे सावट; मैदान अन्‌‍ उद्यानाचा आजही अभाव

अंतर्गत रस्ते अरुंद, कचऱ्याचा सवाल गंभीर; मैदान-उद्यानाचा अभाव कायम

पुढारी वृत्तसेवा

प्रभाग क्रमांक : 6 येरवडा-गांधीनगर

मुकुंद कदम

प्रभाग क्रमांक 6 मध्ये (येरवडा-गांधीनगर) मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टीचा भाग असून, काही अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र, काही अंतर्गत रस्त्यांवर आणि पदापथांवरी पथारी व्यावसायिकांनी अतिक्रमण केले असून, अनधिकृत पार्किंगही केले जात आहे. यामुळे रस्ते वाहतुकीसाठी अरुंद होऊन वाहतूक कोंडी होत आहे. तसेच कचरा, सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था, महापालिकेच्या शाळेचा खालावत चाललेला दर्जा, मैदान आणि उद्यानाचा अभाव, यासह विविध समस्या आजही कायम आहेत.

येरवडा येथील गाडीतळ ते राज चौक रस्त्याला सध्या अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. या मार्गांवरून काही वर्षांपूर्वी पीएमपीची बस विश्रांतवाडी, पुणे स्टेशनला जात असे. मात्र, अतिक्रमणांमुळे हा रस्ता आता अरुंद झाल्याने दुचाकी जाणेही अवघड झाले आहे. अशीच परिस्थिती प्रभागातील इतर अंतर्गत रस्त्यांची झाली आहे. नागरिकांनी आधीच एकमेकांच्या घरांना खेटून घरे बांधली असल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा होत असून, नैसर्गिक नालेही गायब झाले आहेत. लक्ष्मीनगर, जय जवाननगर, पोतावस्ती आदी भागांत पावसाळी नाले नाहीत. परिणामी, दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊन नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरत आहे.

याबाबत महापालिका प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात नाहीत. तसेच, माजी लोकप्रतिनिधींचे या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष झाल्याने दरवर्षी पावसाळ्यात ही समस्या उद्भवत असल्याचे नागरिकांनी सांगितले. प्रभागात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत असून, ठिकठिकाणी कॉनिक पॉइंट तयार झाले आहेत. सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. महापालिकेने नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयाच्या मागील बाजूस पथारी व्यावसायिकांसाठी गाळे बांधले आहेत. मात्र, ते कित्येक वर्षांपासून वापराविना पडून असल्याचेही नागरिकांनी सांगितले.

प्रभागात या भागांचा समावेश

येरवडा गावठाण, गाडीतळ, गणेशनगर, लक्ष्मीनगरचा काहीसा भाग, गांधीनगर, जय प्रकाशनगर, प्रेस कॉलनी, जेल वसाहत, शास्त्रीनगर अशा सुमारे तीन ते चार किलोमीटर परिसराचा या प्रभागात समावेश आहे.

दोन उड्डाणपुलांच्या कामाची प्रतीक्षा येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि बिंदू माधव चौकातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून उड्डाणपूल उभारण्याची मागणी नागरिकांकडून होती. माजी आमदार सुनील टिंगरे यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केल्याने या दोन्ही उड्डाणपुलांना मान्यता मिळाली आहे. तसेच, शीला साळवी भाजी मंडईच्या दुमजली वास्तूसही मान्यता मिळाली. मात्र, ही कामे अद्यापही प्रतीक्षेत आहेत.

प्रभागातील प्रमुख समस्या

येरवडा येथील भाजी मंडई रस्त्यावरील विक्रेत्यांची अतिक्रमणे

गुंजन चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पर्णकुटी चौकातील वाहतूक कोंडी

कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत असून, क्रॉनिक पॉइंटही वाढलेत

सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष

महापालिकेच्या शाळेचा खालावत चाललेला दर्जा

प्रभागात उद्यान आणि मैदान उपलब्ध नाही

महापालिकेच्या डांबर प्लँटमुळे होणारे प्रदूषण

महापालिकेचे जलतरण तलाव दोन वर्षांपासून बंद

प्रभागात झालेली प्रमुख कामे

गोल्फ क्लब चौकात छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपूल

लक्ष्मीनगर ते पर्णकुटी चौकादरम्यान ड्रेनेजलाइनचे काम सुरू

लक्ष्मीनगर येथील पोलिस स्टेशनला मान्यता मिळाली

अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण

माननीयांनी या प्रश्नांची उत्तरे द्यावीत

येरवडा परिसरातील अतिक्रमणे का हटवली जात नाहीत?

लक्ष्मीनगर, राज चौकातील वाहतुकीची समस्या सुटणार कधी?

लक्ष्मीनगर, जय जवाननगर परिसरात पावसाळी नाले कुठे आहेत?

गोल्फ क्लब चौक, गुंजन चौकातील वाहतूक कोंडीची समस्या कधी सुटणार?

येरवडा येथील गाडीतळ परिसरातील विद्युतजाळे काढले असून, विद्युतवाहिन्या भूमिगत करण्यात आल्या. जुन्या झालेल्या ड्रेनेजलाइन, जलवाहिन्या बदलण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. गुंजन चौकातील लुप्त झालेला पावसाळी नाला शोधून नव्याने पाइपलाइन टाकण्यात आली आहे. राजीव गांधी रुग्णालयात येणाऱ्या गरीब, गरजू रुग्णांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
अश्विनी लांडगे, माजी नगरसेविका
लक्ष्मीनगर, लमाणवस्ती, जय जवाननगर परिसरातील जीर्ण झालेल्या ड्रेनेजलाइन बदलण्यात आल्या आहेत. बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावर भर देण्यात येत आहे. तसेच, प्रभागात विविध लोकोपयोगी कामे करण्यात आली आहेत.
श्वेता चव्हाण, माजी नगरसेविका
येरवडा परिसरातील अंतर्गत रस्त्यांची कामे केली असून, पावसाळी वाहिन्याही टाकण्यात आल्या. तसेच, जुन्या झालेल्या सांडपाणी वाहिन्या देेखील बदलण्यात आल्या आहेत. यासह प्रभागामध्ये विविध विकासकामे केली आहते.
अविनाश साळवी, माजी नगरसेवक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT