खुटबाव: पुणे-सोलापूर महामार्गावर यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत मॉडिफाइड सायलेन्सर बसविलेल्या पाच बुलेट दुचाकीतून कर्णकर्कश फटाक्यांसारखा आवाज काढणाऱ्यांवर यवत पोलिसांनी कडक कारवाई केली. पकडण्यात आलेल्या बुलेटच्या मॉडिफाइड सायलेन्सरवर थेट रोडरोलर फिरवून ते नष्ट करण्यात आले, अशी माहिती यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली
संबंधित बुलेट दुचाकी ताब्यात घेऊन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती यांच्यामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, संबंधित दुचाकीस्वारांकडून एकूण 38 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच या वाहनांची नोंदणी निलंबित करण्याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
यवत पोलिस ठाण्याचे वाहतूक पथक मध्यरात्रीच्या सुमारास पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणाऱ्या महामार्गावर गस्त घालत असताना पाच बुलेट दुचाकीस्वार मॉडिफाइड सायलेन्सरमधून मोठा फटाके फोडल्यासारखा आवाज काढत जात असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी पाठलाग सुरू करताच संबंधितांनी भांडगाव फाटा येथे यू-टर्न घेऊन पुन्हा पुणे बाजूकडे पळ काढला. मात्र, कासुर्डी टोलनाका येथे नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी पाचही जणांना त्यांच्या बुलेटसह ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलिस निरीक्षक देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश माने, पोलिस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, अक्षय मोरे, पोलिस हवालदार प्रवीण जायभाय, प्रमोद शिंदे, गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव, महेंद्र चांदणे, रामदास जगताप, संदीप देवकर, दत्ता काळे, विकास कापरे, भुलेश्वर मरळे, शुभम मुळे, मोहन भानवसे यांच्या पथकाने केली.