वर्षा कांबळे
पिंपरी : दिवाळीच्या सणात पणतीबरोबर महत्त्वाचे स्थान असते ते रांगोळीचे. दिवाळीनिमित्त बाजारात रांगोळी मोठ्या प्रमाणात दाखल झाली आहे. दिवाळीनिमित्त रांगोळी काढणे आणि त्यात रंग भरणे हे महिलांवर्गाचे आवडीचे काम असते. फ्लॅट संस्कृतीतील कमी जागेमुळे बाजारात स्टिकर्स, आर्टिफिशिअल रांगोळी काढली जात आहे. मात्र, यंदा वुडन, वुलन आणि मॅट रांगोळीचा पर्याय उपलब्ध आहे.(Latest Pune News)
वुडन रांगोळी ही इतर रांगोळीसारखी छाप करून काढली जाणारी रांगोळी नाही. स्टिकरसारखी चिटकवायचीदेखील गरज नाही तर ही रांगोळी आपण एका जागेवरुन कुठेही हलवू शकतो. तसेच, रांगोळी पुसण्याची भीती नाही. यामध्ये लाकडी नक्षीदार साच्यामध्ये रंग भरुन ही रांगोळी दारामध्ये किंवा घरामध्ये कुठेही ठेवू शकता. वेगवेगळ्या गोल, चौकोनी अशा आकारामध्ये ही रांगोळी उपलब्ध आहे.
मॅट रांगोळी हीदेखील सुट्या भागांमध्ये मिळते. पॅकिंगमध्ये दाखविल्यानुसार तिची मांडणी केली जाते. ज्यांना रांगोळी काढता येत नाही अशांसाठी हा छान पर्याय आहे. तसेच, ही पुन्हा पुन्हा वापरता येते. महिलांना स्वच्छता, फराळ, सजावट करण्यात वेळ जातो. अशावेळी अशी मॅट रांगोळी मिळाल्यास कामे सोपे होणार आहे.
बाजारात रांगोळीचे वेगवेगळे स्टीकर मिळत आहेत. छोट्या-मोठ्या आकारात हे रांगोळीचे स्टीकर एकदा लावले की झाले. तसेच, रांगोळीची डिझाईन असलेली चाळणी बाजारात विविध आकारात आणि नक्षीत उपलब्ध आहे. 10 ते 50 रुपयांपर्यंत रांगोळीची ही चाळणी बाजारात मिळत आहे. लक्ष्मीच्या पावलांचे स्टिकर्स, तोरणाचे स्किटकर्सदेखील उपलब्ध आहेत.
लोकरीपासून आणि रेशमी धाग्यापासून बनविलेली ही रांगोळी खूपच खास आहे. कारण वापरल्यानंतर वॉशेबल असल्याने खराब झाली तरी पुन्हा पुन्हा वापराता येते. यामध्ये कॉर्नर पीससारखे पीस असतात. पायऱ्यांवर, घराच्या कोपऱ्यामध्ये, भिंतीच्या कडेला ही रांगोळी ठेवता येते. यामध्ये फ्लोरेसंट कलर असल्याने जणूकाय फुलांची रांगोळी काढल्यासारखा भास होतो.