

सासवड : पुरंदर तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सासवड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे पक्ष, राष्ट्रवादीसह, काँग्रेस, शिवसेना (उ.बा.ठा) अशा सर्वपक्षीयांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या नगरपालिकेमध्ये भाजप- शिवसेना(शिंदे) यांच्यात मुख्यतः लढत होणार असल्याचे चित्र आहे.आगामी निवडणुकीत शिवसेनेचे धनुष्य पेलणार की, भाजपचे कमळ फुलणार? यावरून नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.(Latest Pune News)
सासवड नगरपरिषदेवर गेली दहा वर्षे माजी आमदार दिवंगत चंदूकाका जगताप आणि तत्कालीन काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेसने बाजी मारली होती. शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातच प्रमुख स्पर्धा होती. मात्र, संजय जगताप काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झाल्याने यंदाच्या निवडणुकीतील भाजपसाठीची त्यांची भूमिका निर्णायक ठरेल.
विसर्जित नगरपरिषदेत काँग्रेस प्रणित जनमत विकास आघाडीची सत्ता होती. यापूर्वीच्या 9 प्रभागांवरून आता 11 प्रभागांत ही निवडणूक होणार आहे. मागील निवडणुकीत 9 प्रभागांतून 19 नगरसेवक आणि नगराध्यक्ष तसेच दोन स्वीकृत सदस्य अशी वाढ झाली आहे. तर स्वीकृत सदस्यांची संख्या 3 झाली आहे. विसर्जित नगरपरिषदेत जनमत विकास आघाडीचे 15 सदस्य आणि नगराध्यक्ष तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी 2 सदस्य आणि 2 स्वीकृत सदस्य होते. एकूण सदस्य संख्येपैकी आरक्षित जागांवर दोन सदस्य आणि नगराध्यक्ष आहेत.
गत निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी एकत्र येत आघाडी केली होती, तर भाजपा काही जागांवर स्वतंत्र लढली होती. यंदा ही संजय जगताप यांच्या नेतृत्वाखालील जनमत विकास आघाडीकडून सर्व जागांवर निवडणूक लढविली जाणार आहे. शिवसेना(शिंदे)चे आमदार विजय शिवतारे हे या निवडणुकीत मोठी ताकद उभी करणार आहेत. या वेळी जनमतकडून लढण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी असून, काही युवकांनी अपक्ष लढण्याचीही तयारी ठेवली आहे.
वर्तमान राजकीय परिस्थिती पाहता या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) अधिकृत उमेदवार रिंगणात असणार आहेत. तर काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) दिसण्याची शक्यता कमी असून, त्यांची अद्याप कोणतीही तयारी दिसत नाही. आरक्षण जाहीर झाल्यानंतर संभाव्य नावे समोर येत आहेत.
भाजपकडून माजी उपनगराध्यक्ष अजित जगताप, साकेत जगताप, आनंदभैय्या जगताप, शिवसेना (शिंदे गट) माजी नगरसेवक सचिन भोंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) माजी उपनगराध्यक्ष वामनतात्या जगताप, माजी नगरसेवक गणेश जगताप यांची नावे चर्चेत आहेत. तर महाविकास आघाडी यांच्या संभाव्य युतीमुळे उमेदवारांच्या मनात संभम आहे. अनेक प्रमुख दावेदार कोणत्या पक्षातून निवडणूक लढवतील, हे अद्याप निश्चित झालेले नाही. त्यामुळे ही निवडणूक अधिकच रंजक होणार आहे.