

Khadakwasla national defence academy Cadet Death:
पुणे : खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी (एनडीए) मध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या प्रथम सत्रातील कॅडेटने गळफास घेऊन आत्महत्या केली. अंतरिक्ष कुमार सिंह (वय 18) असे त्याचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (दि.10) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. अंतरिक्ष हा मूळचा लखनौ येथील राहणारा होता.(Latest Pune News)
मागील सहा महिन्यांपासून तो एनडीएत प्रशिक्षण घेत होता. त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी सैन्य दलातील सेवेची आहे. घटनास्थळी पोलिसांना कोणत्याही प्रकारची चिठ्ठी मिळून आलेली नाही. त्यामुळे अंतरिक्ष याने आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून केली, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
दरम्यान, एनडीए प्रशासनाने या घटनेची अधिकृत पुष्टी केली असून, घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी (चौकशी समिती) नेमण्यात आली आहे. याप्रकरणी, उत्तमनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
एनडीएच्या माहितीनुसार, पहाटेच्या वेळी नियमित प्रशिक्षणासाठी उपस्थित न राहिल्याने सहकारी कॅडेट्सनी अंतरिक्ष याच्या केबिनकडे जाऊन पाहिले. त्या वेळी तो गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला. त्याला उपचारासाठी तत्काळ खडकवासला येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, सकाळी साडेसहा वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती तातडीने स्थानिक पोलिस तसेच कुटुंबीयांना देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
एनडीए प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कॅडेट अंतरिक्ष कुमार सिंह यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. या कठीण प्रसंगी एनडीए परिवार त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. हा कॅडेट प्रबोधिनीच्या प्रथम वर्षात शिकत होता, त्याच्या खोलीमध्ये तो मृतावस्थेत शुक्रवारी पहाटे साडेसहा वाजता आढळून आला. या घटनेची आम्ही न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.