

पुणे : राज्यातील कार्यरत चारही कृषी विद्यापीठांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक रिक्त जागा असून यामध्ये लवकरच भरती प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा आहे. कृषी विद्यापीठांमधील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, शास्त्रज्ञांसह बहुतांशी रिक्त जागांबाबतचा सुधारित आकृतीबंध कृषी परिषदेच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला असून संबंधित पदांची भरती प्रक्रिया लवकरच राबविण्यात येईल, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी येथे दिली.(Latest Pune News)
येथील महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि परभणी येथील डॉ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठे कार्यरत आहेत. सध्या विद्यापीठांमधील रिक्त जागांचा विषय ऐरणीवर आहे. कारण या विद्यापीठांमधील प्राध्यापकांच्या सुमारे 45 टक्के, तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. त्याचा परिणाम कृषी शिक्षणासह संशोधन व विस्तार कार्यावर होत आहे. त्यामुळे रिक्त जागा तातडीने भरण्याची मागणी सतत होत होती. त्या पार्श्वभूमीवर विचारले असता भरणे यांनी ही माहिती दिली.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकतीच जाहिर केलेल्या क्रमवारीत कृषी विद्यापीठांच्या गटात राज्यातील एकाही विद्यापीठाला स्थान नसल्याबद्दल विचारले असता या संदर्भात नक्कीच सुधारणा करण्यात येईल’ असेही भरणे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
राज्यात कार्यरत असलेल्या चार कृषी विद्यापीठांमध्ये पीएच.डी.साठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने शिष्यवृत्ती देऊन आमच्या पाठीशी उभे रहावे, अशी मागणी संशोधक विद्यार्थ्यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे शुक्रवारी (दि.10) येथे केली.
राज्य कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या आढावा बैठकीसाठी भरणे पुण्यात आले असता संशोधक विद्यार्थ्यांच्या समूहाने त्यांची भेट घेऊन याप्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली. त्यावेळी ‘प्रलंबित शिष्यवृत्तीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून बैठक आयोजित करण्यात येईल. हा विषय लवकरात लवकर मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न असेल, असे आश्वासन कृषीमंत्री भरणे यांनी दिले.
केंद्राला नुकसानीबाबतचा भक्कम प्रस्ताव देण्याचे काम अंतिम टप्प्यात
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देणार: कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा पुनरुच्चार
राज्यात मराठवाड्यासह अन्य ठिकाणच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबतची माहिती कृषी, महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून संकलित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. केंद्राला प्रस्ताव पाठवल्यानंतर त्यात बदल करता येत नाही. त्यामुळे सर्व माहितीसह परिपूर्ण असा भक्कम प्रस्ताव केंद्र सरकारला तत्काळ पाठविण्यात येत असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी सर्व मदत करण्यात येणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
राज्य कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी शुक्रवारी (दि. 10) दुपारी बोलत होते. शेतकऱ्यांना मिळालेली रक्कम तुटपुंजी असल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, शेतकऱ्यांची भावना रास्त आहे. पहिल्या टप्प्यातील ही मदत एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे आहे. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केलेली वाढीव रक्कम मिळणार आहेच. जास्त रक्कम मिळल्यानंतर त्यांचा रोष कमी होईल. ती लवकरात लवकर मिळेल. शेतकऱ्यांनी थोडा धीर धरावा. राज्य सरकार अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे ते या वेळी म्हणाले.
पाऊस आता थांबला आहे. विदर्भ, मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात मी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फिरलो आहे. मी कुठे मुलाखत देण्यासाठी अथवा फोटोसाठी फिरलो नाही. त्या-त्या जिल्ह्याचे पालकमंत्रीही नुकसानीची पाहणी करण्यासाठी फिरत आहेत. त्यांचाही अहवाल आम्ही घेत आहोत. दरम्यान, शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्यात अडचणी येत असल्याबद्दल विचारले असता भरणे म्हणाले, अतिवृष्टीमुळे नुकसान शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असताना अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे कोणी पंचनामा करण्यापासून वंचित राहिल्यास संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येईल.