पिंपरी : राहुल हातोले : घर मालक आणि माझ्यामध्ये भाडे कराराच्या रकमेची विभागणी करून एजंटद्वारे रावेत येथील सदनिकेचा करार करण्याचे ठरविले.
त्यानुसार घर मालकाची बायोमेट्रिकद्वारे हाताच्या ठशांची पडताळणी करून अर्ज भरण्यात आला. मात्र, माझ्या हाताचे ठसेे उमटत नसल्याने बायोमेट्रिक होत नव्हते. पूर्वी त्वचा रोगामुळे हातावरील साल सारखी जात होती.
आता मात्र काही त्रास नव्हता. तास दीड तास होऊन गेला, दोन्ही हातांच्या बोटांचे ठसे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकाही बोटाचे ठसे उमटत नव्हते. अॅग्रिमेंट करणार्या एजंटने हाताच्या बोटांना दोन ते तीन प्रकारचे सॅनिटायझर लावून झाले.
मात्र, त्याचे हे देखील प्रयत्न अयशस्वी ठरले. बराच वेळ झाल्यावर घरमालक मला कार्यालयात जायचे आहे यावर काही तरी तोडगा काढा, असे सांगून निघून गेले. आमचे अयशस्वी प्रयत्न मात्र सुरूच होते. असा अनुभव एका अभियंत्याला घराचे भाडे करार करताना आला.
बर्याचदा ज्येष्ठ नागरिकांच्या बोटाचे ठसे उमटत नसले की, व्हॅसलीन, सॅनिटायझर लावले की बोटाचे ठसे उमटतात. मात्र, या सर्वांचा वापर करूनही हाताचे ठसे उमटत नव्हते.
याशिवाय फेसरिडींग किंवा आयरीस प्रणालीचा पर्याय नसल्याने त्या अभियंत्याच्या सख्या भावाच्या नावाने अॅग्रिमेंट करायचे ठरले. मेव्हण्याचा अपघात झाल्यामुळे तो गावी गेला होता.
तो आल्यानंतरच अॅग्रिमेंटची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या सर्वांमध्ये त्याचा वेळ तर गेलाच सोबतच मानसिक ताणही सोसावा लागला. ही आहे प्रातिनिधिक स्वरूपातील घटना.
शहरात असे अनुभव अनेकांना येत आहेत. कार्यालयातील हजेरी असो शासनाच्या परीक्षा वा सरकारी कार्यालयात जाऊन मालमत्ता संदर्भात दस्त नोंदणी असो आता बायोमेट्रिक पद्धतीचा वापर हा सगळीकडेच अनिवार्य होत आहे.
मात्र, कालपरत्वे हाताच्या ठस्यांमध्ये बदल होतो तर बर्याच नागरिकांना त्वचा रोगांमुळे हाताची ठसे उमटत नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
शंभरामधून दोन ते तीन नागरिकांना अशा प्रकारच्या त्रासाला सामोर जाव लागत असल्याचा अनुभव त्या एजटंने सांगितला. अशा नागरिकांसाठी बायोमेट्रिक पध्दतींसह फेस रीडिंग आणि आयरिस रिडिंगची सोय असावी, असा सूर जनसामान्यामधून उमटत आहे.
मालमत्ता खरेदी, विक्री अथवा भाडे करार अशा कारणांसाठी नोंदणी करीत असताना बायोमेट्रिक हाच एक पर्याय उपलब्ध आहे. मात्र, वयोमानानुसार हाताची ठसे उमटत नसल्याने आधार अपडेट करून पुन्हा ती प्रक्रिया पूर्ण करता येते.
परंतु, असे करार करताना बर्याच नागरिकांचे हाताचे ठसे उमटत नाहीत. त्यामुळे नागरिकांची महत्वाची कामे थांबतात. यावर पर्याय निर्माण होणे अपेक्षित आहे. जेणे करून नागरिकांना होणारा नाहक त्रास थांबणार.
त्यासेबतच कोरोनाच्या पहिल्या लाटेत बर्याच शासकीय व खासगी कार्यालयांनी बायोमेट्रिक पद्धत बंद केली होती. मात्र, आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव बळावू शकतो. यावर पर्याय शोधणे महत्त्वाचे आहे.
या समस्येवर उपाय काढण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. बर्याच अधिकारी व कर्मचार्यांना देखील या समस्येला सामोर जावे लागत आहे. हाताच्या ठशांसह फेस रीडिंग किंवा आयरिस प्रणालीचा वापर पुढील काळात शासन स्तरावर होऊ शकतो.
– अनिल पारेख,मुद्रांक अधिकारी, पुणे शहर.
वयोमानानुसार हाताच्या ठशांमध्ये बदल होतात. डोळ्यांच्या आयरिस (बुब्बुळ)मध्ये मात्र तेवढ्या प्रमाणात बदल होत नाहीत. त्यामुळे आयरिस व फेस रीडिंगचा पर्याय कार्यालयांमध्ये हाताच्या ठशांऐवजी योग्य असू शकतो. त्यामुळे कोरोनासारख्या रोगांना आळा बसेल.
– डॉ. रूपाली महेशगौरी,नेत्ररोग तज्ज्ञ, वायसीएम
दुय्यम निबंधक कार्यालयातील मालमत्ता खरेदी विक्री कामे, रजिस्टर अॅग्रिमेंट, आधार कार्ड अपडेट, सीएससी सेंटरमधून पॅन कार्ड, आधार कार्ड, शॉप अॅक्ट परवाना व लायसन्स आदी कामांसाठी तसेच पैसे काढण्यासाठी, रेशन दुकानातील जीवनावश्यक वस्तूसाठी, नवीन सिम कार्ड घेताना, शिष्यवृत्ती परीक्षा अर्ज, स्पर्धा परीक्षा आदी कामांसाठी बायोमेट्रिकचा वापर करण्यात येतो.