Someshwar Sugar Factory Pudhari
पुणे

VSI Sugar Industry Awards: व्हीएसआय पुरस्कार जाहीर; बारामतीचा सोमेश्वर साखर कारखाना सर्वोत्कृष्ट

राज्यस्तरीय वसंतदादा पाटील पुरस्कार जाहीर; एआय आधारित ऊस उत्पादनासाठी नव्या पुरस्कारांची घोषणा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून (व्हीएसआय) साखर उद्योगात चांगली कामगिरी केल्याबद्दल साखर कारखान्यांना दिले जाणारे पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यामध्ये राज्यस्तरीय कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार बारामतीच्या (जि. पुणे) सोमेश्वर सहकारी कारखान्याला जाहीर झाला आहे. रक्कम रुपये पाच लाख, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. व्हीएसआयचे महासंचालक संभाजी कडू पाटील यांनी बुधवारी (दि. 24) पुरस्कारांची घोषणा पत्रकार परिषदेत केली.

कडू पाटील म्हणाले, “कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) ऊस उत्पादनात वाढत्या वापरासंदर्भात पुढील वर्षापासून स्वतंत्र पुरस्कार दिले जाणार आहेत. व्हीएसआयची 49वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी (ता. 29) होणार असून, या वेळी संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल. कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह सर्व विश्वस्त उपस्थित राहणार आहेत.”

व्हीएसआय संस्थेकडून अन्य पुरस्कारांमध्ये कै. किसन महादेव ऊर्फ आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार हा श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना (शिरोळ-कोल्हापूर) यांना जाहीर झाला आहे. कै. कर्मयोगी शंकररावजी पाटील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार सन 2023-24 करता धाराशिव येथील नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्री या कारखान्यास जाहीर झाला आहे.

कै. अप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील सर्वोत्कृष्ट ऊसविकास संवर्धन पुरस्कार सन 2024-25 साठी सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला आहे. कै. रावसाहेबदादा पवार सर्वोत्कृष्ट आसवणी पुरस्कार वाळवा (जि. सांगली) राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला आहे. कै. राजे विक्रमसिंह घाडगे सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार लातूर जिल्ह्यातील विलास सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला आहे.

कै. विलासरावजी देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार दोन साखर कारखान्यांमध्ये विभागून देण्यात आला आहे. त्यामध्ये डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना (कडेगाव-सांगली) आणि यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना (कराड-सातारा) यांना देण्यात आला आहे. या वेळी पत्रकार परिषदेस साखर अभियांत्रिकीचे विभागप्रमुख राजेंद्र चांदगुडे, मुख्य लेखाधिकारी शिवाजी खेंगरे, मद्यार्क आणि जैवइंधन तंत्रज्ञानाचे विभागप्रमुख डॉ. काकासाहेब कोंडे, मुख्य शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडलग आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT