Veterinary Service Doorstep Maharashtra Pudhari
पुणे

Veterinary Service Doorstep Maharashtra: शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन पशुवैद्यकीय सेवा द्या! सेवेच्या ठिकाणी गैरहजर असल्यास थेट निलंबन

पशुसंवर्धन विभागाच्या सचिवांचे डॉ. रामास्वामी एन यांचे कठोर निर्देश; कामात कुचराई खपवून घेणार नाही, गोपनीय अहवालावर होणार परिणाम.

पुढारी वृत्तसेवा

पुणे : राज्यातील पशुधन हे महत्त्वाचे असून, शेतकऱ्यांच्या गोठ्यापर्यंत जाऊन आवश्यक त्या पशुवैद्यकीय सेवा देण्यास प्राधान्य द्यावे, अशा महत्त्वपूर्ण सूचना पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन यांनी दिल्या आहेत.

जे पशुधन अधिकारी हे त्यांच्या कामाच्या वेळेत त्यांच्या सेवेच्या ठिकाणी उपलब्ध नसल्यास संबंधितांवर निलंबनाची कारवाई केली जाईल. त्यासाठी वरिष्ठांना जबाबदार धरले जाणार असून, कामात कुचराई केल्यास ती खपवून घेतली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिल्याचे सांगण्यात आले.

पशुसंवर्धन विभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक शुक्रवारी (दि. 28) ऑनलाइनद्वारे घेण्यात आली. पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे, अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांच्यासह विभागीय, जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला. त्यावेळी सचिवांनी या सूचना दिल्याची माहिती बैठकीनंतर सूत्रांनी दै. ‌’पुढारी‌’ला दिली.

नॅशनल लाइव्ह स्टॉक डिजिटल मिशन अंतर्गत (एलडीएम) पशुपालकांना द्यावयाच्या सेवांची नोंदणी ऑनलाइन करणे आवश्यक आहे. त्या सेवा तत्परतेने देण्याची जबाबदारी क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांची असून, त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम हे विभाग आणि जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांचे आहे. त्यामुळे केलेल्या कामाचा अहवाल हा ऑनलाइनद्वारे करण्यावर भर द्यावा. पशुवैद्यकीय सेवा, जनावरांचे आजार, त्यांच्या तपासण्या, वंधत्व निवारण, गर्भधारणा व लसीकरणाच्या सुविधा शेतकऱ्यांना गोठ्यावर जाऊन द्या. त्याबाबतचा अहवाल जसा ऑनलाइन दिला जाईल, त्यावरच अधिकारी-कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल लिहिले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे केवळ अहवाल पाठवून न थांबता प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन त्यांना सेवा देण्यासाठी सर्वांनी काम करावे. पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनाही शेतकऱ्यांपर्यंत न्याव्यात. शेतकऱ्यांच्या पशुधनाला वेळेत लसीकरण करण्यासाठी गावनिहाय वेळापत्रक करून त्याची अंमलबजावणी करावी. ज्यामुळे जनावरांचे आजारापासून संरक्षण करण्यास प्राधान्य द्यावे. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी महत्त्वाची आहे.

देशात पशुवैद्यकीय सेवा देण्यात अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्य नेहमीच अग््रेासर राहिलेले आहे. दवाखाने आणि तांत्रिक सेवा शेतकऱ्यांना गोठ्यापर्यंत जाऊन देण्याची क्षमता विभागात असल्याचेही त्यांनी बैठकीत सांगितल्याचे समजले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT